CM Devendra Fadnavis on Maharashtra Drought Solution
हिंगोली : नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरीच्या खोर्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२९) हिंगोली येथे दिले. जिल्ह्यातील विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, फुलाजी शिंदे, कैलास काबरा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की, मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी नदी जोड प्रकल्प हाती घेऊन समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणले जाईल. तसेच फ्लड डायव्हर्जन प्रकल्प राबविला जाणार असून पुराचे पाणी मराठवाड्यात आणले जाईल. या कामाच्या पुढील महिन्यात निविदा काढल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतरत्न नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसर्या टप्यात राज्यातील 7500 गावांसाठी पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाला भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नाव दिले जाईल. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सवा निमित्त देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे विकास कामांसाठी तसेच संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे विकास कामांसाठी निधी देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
चालु वर्षात 25 लाख तर पुढील वर्षात 30 लाख दिदी लखपती केले जाणार आहेत. या शिवाय महिलांची सहकारी संस्था स्थापन करून बहिणींना मिळणार्या पैशातून कर्ज उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करणार आहोत. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका करताना पाकिस्तानचा व्हायरस त्यांच्या डोक्यात शिरल्यामुळे काँग्रेसची मंडळी पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित शेतकरी मेळाव्यात हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी हिंगोली विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी निधीच्या मागणीसह सिंचन अनुशेष दूर करण्याची मागणी केली. येंलदरी धरणाचे पाणी हिंगोलीसाठी द्या, नर्सी नामदेव येथील परिसराच्या विकासासाठी भरीव निधी द्या, सेनगाव येथे एमआयडीसी मंजूर करावी, हिंगोलीतील एमआयडीसीचा विकास करावा, शहरातील जलेश्वर तलावाच्या विकासासाठी निधी द्यावा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रऋषी भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नाव द्यावे, गोरेगाव अप्पर तहसीलला तालुक्याचा दर्जा द्यावा, मराठा समाजाच्या मुलांच्या वसतीगृहासाठी निधी द्यावा, यासह इतर मागण्या केल्या.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे यांनी कळमनुरी विधानसभा मतदार संघातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. यामध्ये प्रामुख्याने इसापूर रमणा येथे असलेल्या पशु पैदास केंद्राच्या जमिनीवर एमआयडीसी उभारावी, औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी द्यावा, आखाडा बाळापूर तालुक्याची निर्मिती करावी, हळद उत्पादक शेतकर्यांसाठी महत्वाचे असलेले हळद शिजवणी यंत्रामध्ये संशोधन करून सुधारणा करावी यासाठी आवश्यक तो निधी द्यावा यासह इतर मागण्या केल्या. आपल्या कमी वेळातील भाषणात कळमनुरी विधानसभा मतदार संघातील अनेक कामे मार्गी लावण्याची मागणी करत माजी आमदार घुगे यांचे पुढील टार्गेट कळमनुरी विधानसभा असल्याचे स्पष्ट झाले.