CJP Abhijit Dipke Pudhari
हिंगोली

CJP Abhijit Dipke: सरकारी स्कूल ठीक करो...!; अभियानाची हिंगोलीतून सुरुवात

शाळेत बेंचेस नाहीत, पण खिडकीला मात्र उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टर; अभिजीत दिपकेंचा सरकारवर संताप

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : स्वातंत्र्याला 80 वर्षे उलटून गेली, तरी आपण ग्रामीण भागातील शाळांमध्ये साधे पिण्याचे पाणी, मुलांना बसायला बेंचेस आणि स्वच्छ स्वच्छतागृहे देऊ शकलो नाही. एकीकडे नवीन संसद, नवीन पीएम हाऊस आणि मंत्र्यांचे फार्महाऊस बांधले जात आहेत, पण देशातील हजारो सरकारी शाळा बंद पाडल्या जात आहेत," असा घणाघाती आरोप कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला आहे.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अभिजीत दिपके यांनी आजपासून राज्यभरात 'सरकारी स्कूल ठीक करो' या अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानाचा शुभारंभ त्यांनी त्यांच्या मूळ गावी, म्हणजेच हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेतून केला. यावेळी त्यांनी शाळेतील विदारक स्थितीवर आणि सरकारच्या शिक्षण धोरणांवर सडकून टीका केली.संतुक पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेची पाहणी करताना दिपके यांना अत्यंत धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी बाके नव्हती. खिडक्यांच्या काचा फुटलेल्या होत्या आणि त्या झाकण्यासाठी चक्क राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरचा (बॅनरचा) वापर करण्यात आला होता. या प्रकारावर दिपके यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

माध्यमांशी संवाद साधताना दिपके यांनी सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "गेल्या 10 वर्षांत देशभरात ९४ हजारांहून अधिक सरकारी शाळा बंद पाडण्यात आल्या आहेत. हे सर्व मुद्दाम केले जात आहे, जेणेकरून खासगी शाळांना फायदा होईल. कारण, या खासगी शाळा मंत्री, आमदार आणि खासदारांच्याच आहेत. त्यांची लूटमार सुरू राहावी म्हणून सरकारी शाळांची दुर्दशा करून त्या बंद पाडण्याचे धोरण राबवले जात आहे."

शाळेतील शिक्षकांच्या अनुपस्थितीबाबत त्यांनी सरपंचांना विचारणा केली असता, त्यांना सांगण्यात आले की, मुख्याध्यापक व शिक्षक दोन महिन्यांपासून शाळेकडे फिरकलेच नाहीत, कारण त्यांना इतर शासकीय आणि सर्वेक्षणाच्या ड्युटींवर लावण्यात आले आहे. यावर संताप व्यक्त करत दिपके म्हणाले, "शिक्षकांचे काम फक्त मुलांना शिकवणे असले पाहिजे. देशात एवढी बेरोजगारी आहे, मग तुम्ही या सर्वेक्षणाच्या कामांसाठी बाहेरून बेरोजगार तरुणांना का लावत नाही? तुम्हाला पैसे वाचवायचे आहेत म्हणून तुम्ही शिक्षकांना विनाकारण इतर 12 भानगडींमध्ये अडकवून ठेवता."

शेतकरी आणि ग्रामीण जनताच खऱ्या अर्थाने दिवसभर उन्हात रांगेत उभे राहून सरकार निवडते, यावर जोर देत दिपके म्हणाले, "तुम्ही आमदार-मंत्री झाल्यावर तुमचे बंगले बांधता, फॉर्च्युनर गाड्या घेता, तुमचे फार्महाऊस होतात. 50 खोके एकदम ओके! पण ज्यांनी तुम्हाला मतदान केले, त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही काय करता? जोपर्यंत गावातील शाळा, आरोग्य आणि उपजीविका सुधारत नाही, तोपर्यंत हा देश विकसित होणार नाही. सप्टेंबरपासून आम्ही देशभरात 'क्या बोलती पब्लिक' हे नवीन अभियानही सुरू करणार असल्याचे दीपके यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT