आखाडा बाळापूर ः वारंगा फाटा-उमरखेड मार्गावरील बसमध्ये प्रचंड गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पिशवीतील सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शारदा विठ्ठल माखणे (वय 56, रा. शेवाळा) या 13 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजता वारंगा फाटा येथून उमरखेडकडे जाणाऱ्या बसने प्रवास करत होत्या. बसमध्ये मोठी गर्दी असल्याने त्यांनी आपली बॅग सीटवर ठेवण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीकडे दिली. यानंतर बसमध्ये बसल्यानंतर काही वेळाने बॅग तपासली असता त्यातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले.
चोरट्याने मंगळसूत्रातील 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी किंमत 35 हजार रुपये तसेच कानातील दोन सोन्याचे झुंबर किंमत 35 हजार रुपये असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बाळापूर पोलीस तपास करीत आहेत.