हिंगोली ः तालुक्यातील जोडतळा येथे घरातील लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून भावजयीचा खून केल्याच्या आरोपावरून दिरास जन्मठेप व 50 हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एस. एन. माने गाडेकर यांनी दिला.
तालुक्यातील जोडतळा येथील सविता जाधव या 22 जुलै 2020 रोजी शेतात जेवण करीत बसल्या होत्या. यावेळी त्यांचा दीर रामेश्वर जाधव हा शेतामध्ये आला त्यांनी मागचा पुढचा विचार न करता सविता यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. यामध्येच सविता यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी रामकिशन काळबांडे यांनी बासंबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी रामेश्वर जाधव यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. बासंबा पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या पथकाने अधिक तपास करून हिंगोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एस.एन. माने-गाडेकर यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले होते. या प्रकारात एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी रामेश्वर समाधान जाधव, वय 27 यास दोषी ठरवत जन्मठेप तसेच 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची पूर्ण रक्कम मयत सविताचे तिन्ही मुलांना देण्यात यावी असा देखील आदेश न्यायालयाने दिला.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील एन.एस. मुटकुळे यांनी काम पाहिले. त्यांना सहायक सरकारी वकील सविता एस. देशमुख (जाधव), ॲड एस.डी. कुटे यांनीही सहकार्य केले. सदर प्रकरणी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक ए.डी. डोईजड यांनी काम पाहिले