

हिंगोली ः लोकनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाल्याची वार्ता जिल्हाभरात पसरताच संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली. त्यांच्या जाण्याने राजकीय नव्हे तर सामाजिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून ते विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांच्याकडून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. वसमत येथे व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बाजारपेठ बंद ठेवून अजित दादांना श्रद्धांजली अर्पित केली.
अजित पवार हे कर्र्तृत्ववान, अभ्यासू आणि निर्णयक्षम नेतृत्व म्हणून ओळखल्या जात होते. जनहिताचे प्रश्न, विकासकामे आणि प्रशासनावर पकड यामुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले. त्यामुळे राज्याच्या विकासाला गती मिळाली. अजितदादांची हिंगोली शहराच्या विकासावर विशेष लक्ष होते. हिंगोलीची नगरपालिका तब्बल 10 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती.
तत्कालीन नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या पुढाकारातून अजितदादा यांच्या सहकार्याने हिंगोलीचे अनेक प्रश्न मार्गी लागले. अजितदादांच्या जाण्याने हिंगोली जिल्ह्यावर शोककळा पसरली. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करीत आपल्या भावना व्यक्त केल्या.