Bribe Case pudhari photo
हिंगोली

Bribe Case : लाचखोर मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

घरभाडे भत्त्यातून शिक्षकाकडून कमिशन, २८ हजार स्वीकारताना रंगेहाथ पकडले

पुढारी वृत्तसेवा

Bribery principal caught by ACB

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा औंढा तालुक्यातील लाख येथील मधोमती विद्यालयाच्या मुख्याध्यापकास शिक्षकाकडून २८ हजार रुपयांची लाच घेताना हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी हिंगोलीत रंगेहाथ पकडले.

औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील मधोमती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाला संपूर्ण वर्षाचा घरभाडे भत्त्यापोटी ५८ हजार रुपयांची रक्कम मिळाली होती. मात्र सदर रकमेतून ५० टक्के रक्कम दे असा मुख्याध्यापक संतोष कढणे याने शिक्षकाकडे तगादा लावला होता.

सदर रक्कम न दिल्यास मुख्यालयी राहत नसल्याचा अहवाल शिक्षण विभागाकडे पाठविण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यानंतर तडजोड होऊन २८ हजार रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान, या प्रकरणात संबधित शिक्षकाने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली होती.

त्यानुसार गुरुवारी हिंगोली येथील खटकाळी बायपास येथे लाचलुचपतचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सुलभा राऊत, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख युनुस, जमादार भगवान मंडलीक, रवींद्र वरणे, राजाराम फुफाटे, शिवाजी वाघ, शेख अकबर, विनोद पुंडगे, महिला पोलिस कर्मचारी योगिता अवचार यांच्या पथकाने सापळा रचला होता.

दरम्यान, दुपारच्या वेळी मुख्याध्यापक कढणे याने संबंधित शिक्षकाकडून २८ हजार रुपयांची लाच घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास रंगेहात पकडले. या प्रकरणी लाचलुचपतचे निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर वाशिमच्या पोलिसांचे पथक मुख्याध्यापक कढणे याच्या मूळगावी वाशिम येथील घराची झडती घेण्यासाठी गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT