Bolero motorcycle collision
औंढा नागनाथ: औंढा नागनाथ ते वसमत मार्गावरील काठोडा चोंडी जवळ शुक्रवारी (दि. 26) दुपारी पावणे एक वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. वसमतकडे जाणाऱ्या भरधाव बोलेरो जीप (MH 22 U 7053) आणि औंढा नागनाथकडे येणाऱ्या दुचाकीची ( MH 38 AC 8756) समोरासमोर धडक झाली.
या अपघातात दुचाकीवरील पांडुरंग रामभाऊ सावंत (वय 53, कुडाळा तालुका, वसमत) यांचा डोक्यावरून चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बोलेरो रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीत पडली.
बोलेरोमध्ये प्रवासी म्हणून असलेले संपत गोरे, सुमित्रा घुगे, लक्ष्मण घुगे, मिनाबाई गोरे आणि इतर दोन व्यक्ती (सर्व रा. सावळी, ता.जिंतूर, जि. परभणी) गंभीर जखमी झाले. त्यांना ॲम्बुलन्सने तातडीने औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
घटना समजताच पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे, उपनिरीक्षक अफसर पठाण, सुभाष जयताडे, महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक राजेश ठाकूर, कलीमुद्दिन खतीब व राजाराम कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली.