हिंगोली : शाळेत कार्यरत नसणाऱ्या बडतर्फ शिक्षणसेवकाने शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगणमत करून शाळेच्या परस्पर बोगस शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करून बडतर्फ शिक्षण सेवकाची नुतन शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित रावसाहेब जानकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नेमणूक करवून घेतली. या प्रकरणात परस्पर समायोजन करून शासनाची फसवणुक व शासकीय रक्कमेचा अपहार केल्याचा प्रकार एका तक्रारीवरून समोर आला आहे.
खानापूर चित्ता येथील विद्यासागर विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक संजय टाकळगव्हाणकर यांनी 31 जुलै रोजी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली असून खानापूर चित्ता येथील श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यासागर विद्यालयात शिक्षण सेवक म्हणून मारोती श्रावण रोकडे यांची बेकायदेशीर नेमणूक असल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण शाळा न्यायाधिकरण लातूर तसेच उच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते.
तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक दिपक चवणे यांनी न्यायालयाने दिलेले आदेश असताना रोकडे यांना रूजू करून घेण्याचे आदेश दिले होते. पुन्हा संस्था न्यायालयात गेली होती. तसेच शिक्षण उपसंचालकांनी या प्ररकरणाची सुनावणी घेऊन 22 जुलै 2026 रोजी शिक्षणाधिकारी चवणे यांचे बेकायदेशीर आदेश रद्द करून शाळा व संस्थेच्या प्रकरणात हस्तक्षेप करू नका असे आदेश दिले होते.
दरम्यान, तत्कालीन शिक्षणाधिकारी दिपक चवणे, पी.जी. पावसे, तत्कालीन शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके, गंगाधर म्हमाने यांनी संगणमत करून विद्यासागर विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्या परस्पर आपल्या पदाचा दुरूपयोग करून मारोती रोकडे यांचे शालार्थ प्रणालीमध्ये परस्पर नाव घेतले, बनावट कागदपत्रे, बनावट सेवापुस्तिका तयार करून तो विद्यासागर विद्यालयातून अतिरिक्त झाला, त्याचे समायोजन परभणी येथील रावसाहेब जामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात करण्यात आले.
जो कर्मचारी कार्यरतच नाही त्याचे समायोजन कसे करता येईल. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, याबाबत संजय टाकळगव्हाणकर यांनी लेखी तक्रार केली असून एसआयटीसमोर साक्ष देण्यास आपण तयार असल्याचे म्हटले आहे.