डिग्रस बु. येथे केळीच्या झाडाला लगडलेले केळीचे घड तर दुसऱ्या छायाचित्रात व्यापाऱ्यांकडून मागणी नसल्याने शेतातच केळीचे घड सडून जात आहेत (Pudhari Photo)
हिंगोली

Banana Prices | दर घसरल्याने शेतातच केळीचे घड सडू लागले : उत्पादन खर्चही वसूल होईना

Hingoli News | जूनपासून केळीचे दर घसरत चालले असून सध्या केळीला फक्त 500 ते 800 प्रति क्विंटल एवढाच भाव मिळत आहे

पुढारी वृत्तसेवा

दत्तात्रय बोडखे

आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील वारंगा, डोंगरकडा, जवळा पांचाळ या परिसरात इसापूर धरणाचे पाणी उपलब्ध असल्याने गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. परंतु यंदा मात्र केळी उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

जूनपासून केळीचे दर घसरत चालले असून सध्या केळीला फक्त 500 ते 800 प्रति क्विंटल एवढाच भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना लागवड खर्चसुद्धा परत मिळत नाही. काही शेतकऱ्यांनी तर तोटा सहन न होताच आपल्या केळीच्या बागा मोडीत काढण्यास सुरुवात केली आहे.

वारंगा फाटा, डोंगरकडा, जवळा पांचाळ, वडगाव, रेडगाव, वसफळ, डिग्रस, सालापूर, गुंडलवाडी आणि दांडेगाव या भागात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड होते. पूर्वी या भागातील केळी पंजाब, गुजरात, हैदराबाद आणि करीमनगर येथे विक्रीसाठी जात असत. तेथे सरासरी 1500 ते 2500 प्रति क्विंटल इतका दर मिळायचा. पण यंदा जूनपासून बाजारभाव कोसळल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

सध्या केळी नांदेड व हैदराबाद बाजारात पाठवली जात असली तरी तेथेही फक्त 500 ते 600 प्रति क्विंटल इतकाच भाव मिळतो. व्यापाऱ्यांकडून मागणी घटल्याने अनेक ठिकाणी शेतातच केळी पिकून सडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या श्रमांचे फळ अक्षरशः डोळ्यांसमोर नष्ट होताना पाहावे लागत आहे.

उत्पादन खर्च वाढला, पण दर घसरले

एका एकरावर सुमारे 1,400 ते 1,500 केळीची रोपे लावली जातात. लागवडीसाठी साधारण 1 लाख खर्च येतो. साधारण परिस्थितीत एकरी 30 टन उत्पादन मिळते आणि दर योग्य (1500– 2000 प्रति क्विंटल) मिळाल्यास 3 लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. पण सध्याच्या 500 दरामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

आमच्याकडे 6 एकर क्षेत्रावर 8 हजार केळीची रोपे आहेत. मात्र सध्या मिळणारा दर 500 पेक्षाही कमी आहे. लागवड खर्च निघत नसल्याने शेतातील केळी झाडालाच सडून जात आहेत. सरकारने किमान 1500 प्रति क्विंटल दर निश्चित करून आम्हाला मदत करावी.
- बालाजी खांडरे व प्रदीप खांडरे, शेतकरी (डिग्रस बु.)

केळीचा दर: 500– 800 प्रति क्विंटल

लागवड खर्च: सुमारे 1 लाख प्रति एकर

उत्पादन: 30 टन प्रति एकर

नफा मिळण्यासाठी अपेक्षित दर: 1500 प्रति क्विंटल

व्यापाऱ्यांकडून मागणी घटल्याने शेतातच केळी सडत आहेत

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी वाढू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT