हिंगोली : संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे 'जय जय रामकृष्ण हरी'च्या गजरामध्ये हजारो भाविकांनी आषाढी एकादशीनिमित्त बुधवारी पहाटे पासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. भाविकांची उपस्थिती अन् हरीनामाच्या गजराने नर्सीत प्रति-पंढरपूर अवतरल्याचे चित्र पहावयास मिळाले. सकाळपासून सुमारे 50 हजारपेक्षा अधिक भाविकांनी संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. हा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
आषाढी एकादशी निमित्त नर्सी नामदेव येथे संत नामदेव महाराज मंदिरामध्ये संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या हस्ते सकाळी सात वाजता महापूजा करण्यात आली. यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी किर्तनकार, पदाधिकारी मनोज आखरे, द्वारकादास सारडा, डॉ. रमेश शिंदे, बद्रीनाथ घोंगडे, पोलिस उपाधिक्षक सुरेश दळवी, सहाय्यक पोलिस निरीक्षक बद्रीनाथ सानप, ज्ञानेश्वर किर्तनकार, शशीकांत गवते यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती. महापूजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. दरम्यान दर्शन घेता यावे यासाठी आज पहाटे पासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या. नर्सी नामदेव परिसरातील गावकरी मिळेल त्या वाहनाने दर्शनासाठी नर्सी येथे येत आले होते. माणिकराव लोडे यांच्या वतीने भाविकांच्या फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे.