खदीर अहेमद
वसमत : शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या प्राचीन तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना एक विस्मयकारक घटना समोर आली आहे. तलावाच्या संरक्षण भिंतीसाठी खोदकाम सुरू असताना अचानक एक प्राचीन भुयारी मार्ग आढळून आला असून, या घटनेमुळे शहरात कुतूहल आणि चर्चेला उधाण आले आहे.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे वसमतचा हा ऐतिहासिक तलाव फुटला होता. आमदार राजू नवघरे यांच्या पाठपुराव्यातून सध्या या तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. जेसीबीच्या साहाय्याने पायाचे खोदकाम सुरू असताना, जमिनीखाली दगड आणि चुन्याने बांधलेला एक पक्का भुयारी मार्ग समोर आला. हे बांधकाम अत्यंत दर्जेदार असून जुन्या काळातील प्रगत स्थापत्य शास्त्राचा हा उत्तम नमुना मानला जात आहे.
ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच भुयारी मार्ग पाहण्यासाठी तलाव परिसराकडे हजारो नागरिकांनी धाव घेतली. वसमतला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे, त्यामुळे हा मार्ग नेमका कोठे जातो? ही तत्कालीन पाणीपुरवठा यंत्रणा आहे की युद्धाच्या काळातील गुप्त रस्ता? याबाबत नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. काही ठिकाणी तर गुप्त धन असल्याच्या अफवांनीही जोर धरला आहे.
हा भुयारी मार्ग कोणत्या कालखंडातील आहे आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व काय, हे पुरातत्त्व विभागाच्या तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. हा मार्ग शहराच्या जुन्या खुणा अधोरेखित करतो, यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकणे गरजेचे आहे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.