हिंगोली ः येथील दिव्यांग शिक्षिका मीराताई कदम व त्यांचे पती धनराज कदम यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी मागील काही वर्षापासून सुरू केलेल्या सेवासदन वसतिगृहास दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन तब्बल तासभर वसतिगृहाची पाहणी करून वसतीगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. जाताना कदम दाम्पत्यास काही मदत लागल्यास मुंबईला या असा निरोपही देऊन गेले होते. बुधवारी अजितदादांचे विमान अपघातात निधन झाल्याची माहिती मिळताच कदम दाम्पत्य अक्षरशः हादरून गेले. अजितदादांच्या त्या सात वर्षांच्या आठवणींनी दोघांनीही आपल्या आश्रूंना वाट मोकळी करून दिली.
हिंगोली जिल्ह्यात ऑक्टोबर 2019 च्या दरम्यान अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची शिवस्वराज्य पदयात्रा काढण्यात आली होती. पदयात्रेदरम्यान दिव्यांग शिक्षिका मीरा कदम व त्यांचे पती धनराज कदम यांनी आत्महत्याग्रस्त पाल्यांसाठी स्वतःची पदरमोड करून सेवासदन नावाचे वसतिगृह चालवत असल्याची माहिती मिळताच भल्या सकाळी 7 च्या दरम्यान त्यांचा ताफा सेवासदन वसतिगृहात धडकला.
स्वतः अजितदादा यांनी संपूर्ण वसतिगृहाची पाहणी केली. त्यांच्यासोबत तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अमोल मिटकरी, दिलीप चव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. दिव्यांग शिक्षिका हे सेवासदन वसतीगृह चालवते याचे खूप कौतुक दादांना वाटले. मुलांना कोणता आहार दिला जातो याबाबतची सर्व तपासणी दादांनी केली होती.
सेवासदन मधील कम्प्युटर व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, मुलांना आंघोळीसाठी गरम पाणी, उत्तम भोजन व्यवस्था आणि मुलांची शिस्त आणि संस्कार पाहून दादा भारावून गेले होते. नंतर मीरा कदम आणि धनराज कदम यांच्याशी संवाद साधून दादांनी सांगितलं की तुझे हे काम करत आहेस ते खूप धाडसाचं काम आहे आणि कधी गरज लागली तर मला नक्की सांग. एक दिव्यांग शिक्षिका एवढं मोठं काम समाजात उभा करू शकते याचे खरंच कौतुक आहे असे म्हणून त्यांनी मीरा कदम यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
तसेच सेवासदनमध्ये शिकणाऱ्या सर्व मुलांना बरोबर दादांनी वैयक्तिक संवाद साधला. ज्या मुलांसोबत दादांनी संवाद साधला आज ती मुले डॉक्टर, इंजिनियर आहेत. काही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तर काही मुले नोकरीला लागलेली आहेत. धनराज कदम यांना दादांनी कधीही कोणतीही मदत लागल्यास फोन करा असे सांगितले.
विमान अपघातात अजितदादांच्या निधनाची बातमी ऐकल्यापासून सेवासदन परिवार शोकाकुल आहे. सेवासदनमधील मुले जी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले आहेत आणि काही मुले अनाथ आहेत अशा सर्व मुलांच्या भावना अनावर झाल्या होत्या. कदम दाम्पत्य तर दादांच्या आठवणीने धायमोकलून रडले. आता अजितदादा पुन्हा सेवासदनला भेट देणार नाहीत ही भावनाच त्यांना पटत नव्हती. संपूर्ण सेवासदन परिवाराने लाडक्या अजितदादाला श्रद्धांजली वाहून आपल्या आश्रूंना वाट मोकळी करून दिली.