उपमुख्यमंत्री अजित पवार सेवासदनमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना  Pudhari
हिंगोली

Ajit Pawar Death |अजितदादांच्या निधनाने हिंगोलीतील 'सेवासदन' भेटीच्या स्मृती जाग्या; विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू

Hingoli News | कदम दांपत्य भावूक; सेवासदन परिवाराने दिली अश्रूंना वाट

पुढारी वृत्तसेवा

Hingoli Sevasadan Hostel

हिंगोली : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी मागील अनेक वर्षांपासून ‘सेवासदन’ वसतिगृह चालवणाऱ्या दिव्यांग शिक्षिका मीराताई कदम व त्यांचे पती धनराज कदम यांना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींनी अक्षरशः गहिवरून टाकले. सात वर्षांपूर्वी अजित पवार यांनी सेवासदनला दिलेल्या भेटीच्या आठवणी बुधवारी त्यांच्या विमान अपघातातील निधनाच्या बातमीने पुन्हा जाग्या झाल्या आणि कदम दांपत्यासह संपूर्ण सेवासदन परिवार अश्रूंना वाट मोकळी करून देऊ लागला.

ऑक्टोबर २०१९ मध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्ह्यात ‘शिवस्वराज्य पदयात्रा’ काढण्यात आली होती. या पदयात्रेदरम्यान आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी मीराताई व धनराज कदम स्वतःची पदरमोड करून ‘सेवासदन’ वसतिगृह चालवत असल्याची माहिती मिळताच सकाळी सुमारे सात वाजता अजित पवार यांचा ताफा सेवासदनमध्ये दाखल झाला.

अजित पवार यांनी तब्बल तासभर वसतिगृहाची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तत्कालीन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अमोल मिटकरी, दिलीप चव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. दिव्यांग शिक्षिका असूनही मीराताई कदम समाजासाठी करत असलेल्या कार्याचे अजित पवार यांनी मनापासून कौतुक केले.

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार, संगणक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, आंघोळीसाठी गरम पाणी, भोजन व्यवस्था तसेच मुलांची शिस्त व संस्कार पाहून अजित पवार भारावून गेले होते. त्यांनी मीराताई व धनराज कदम यांच्याशी संवाद साधत, “हे काम खूप धाडसाचं आहे. कधीही मदतीची गरज भासली तर थेट मला सांगा,” असे आश्वासन दिले होते. एक दिव्यांग शिक्षिका एवढे मोठे समाजोपयोगी कार्य उभे करू शकते, याचा अभिमान असल्याचे सांगत त्यांनी मीराताईंच्या पाठीवर कौतुकाची थापही दिली होती.

अजित पवार यांनी सेवासदनमधील प्रत्येक विद्यार्थ्याशी वैयक्तिक संवाद साधला होता. त्या भेटीत ज्यांच्याशी त्यांनी संवाद केला, त्यापैकी अनेक विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनिअर झाले असून काही स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, तर काही नोकरीत स्थिरावले आहेत. धनराज कदम यांना देखील “कधीही संकोच न करता फोन करा,” असे त्यांनी सांगितले होते.

बुधवारी अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाची बातमी समजताच संपूर्ण सेवासदन परिवार शोकसागरात बुडाला. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील तसेच अनाथ मुलांच्या भावना अनावर झाल्या होत्या. अजितदादा पुन्हा कधीही सेवासदनला भेट देणार नाहीत, ही जाणीव स्वीकारणे कदम दांपत्यासाठी अत्यंत वेदनादायी ठरले. अखेर सेवासदन परिवाराने लाडक्या अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करत अश्रूंनी निरोप दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT