Abhijeet Dipke Grandmother Death: कॉकरोज जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिजीत दिपके यांची आजी सावित्रीबाई दिपके यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांनी हिंगोलीच्या संतुक पिंपरी येथील मूळ गावी अखेरच्या श्वास घेतला.
अभिजीत दिपके हा नुकताच दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी पोहचला होता. मात्र विमानातून उतरण्याआधीच दिल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना ताब्यात घेतलं असून ते दिल्ली विमानतळावरच आहेत की त्यांना दुसरीकडे नेण्यात आलं आहे याबाबत मात्र माहिती मिळालेली नाही.
अभिजीत दिपकेच्या आजीचे निधन झाल्याचे वृत्त आल्यानंतर आता कॉकरोज जनता पार्टीच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल अन् अभिजीत गावी येणार की आंदोलन असंच पुढं सुरू ठेवण्यासाठी दिल्लीतच थांबण्याचा निर्णय घेणार हे पहावं लागेल.
ज्यावेळी अभिजीतला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतली त्यावेळी अभिजीतच्या आई-वडिलांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी आम्ही आमचा मुलगा देशाला वाहिला असल्याचं सांगितलं. त्यांनी आंदोलन दाबणाऱ्या सरकारकडून कोणतीही अपेक्षा नाही असं देखील बोलून दाखवलं.
सीजेपीने आज १० ऑक्टोबर रोजी जंतर मंतर २.० या आंदोलनाची घोषणा केली होती. मतदार यादीतील मतदारांची नावे डिलीट करण्याचा आरोप झालेल्या ज्ञानेश्वर कुमार यांचा राजीनामा मागण्यात आला आहे. त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून कॉकरोज जनता पार्टीने आंदोलन केलं आहे.
ज्यावेळी अभिजीत आणि त्याच्या तीनही प्रमुख साथीदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर कॉकरोज जनता पार्टीच्या आंदोलनाची जबाबदारी अजिंक्य शिंदेकडे देण्यात आल्याचे वृत्त आहे. आता सीजेपीच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.