abhijeet dipke climbs on water tank in govt school what said about sonam wangchuk
पुढारी ऑनलाईन : ‘स्कूल ठीक करो’ अभियानाअंतर्गत एका सरकारी शाळेत पोहोचलेले कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संयोजक अभिजीत दीपके चक्क शाळेच्या पाण्याच्या टाकीवर चढले. त्यांनी शाळेतील स्वच्छतागृहात जाऊन पाण्याचा पुरवठा होत आहे की नाही, याचीही पाहणी केली. १५ ऑगस्टपासून CJPने हे अभियान सुरू केले आहे.
‘स्कूल ठीक करो’ अभियानाअंतर्गत अभिजीत दीपके सध्या सरकारी शाळांना भेटी देऊन तेथील समस्या आणि कमतरता समोर आणत आहेत. याच मोहिमेअंतर्गत ते एका सरकारी शाळेच्या पाण्याच्या टाकीवर चढले आणि तेथील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, याची तपासणी केली.
याच्या एक दिवस आधी त्यांनी एका शाळेची जीर्ण आणि भेगा पडलेली इमारत दाखवली होती. जमिनीवर अंथरलेल्या ताट-पट्या हटवल्यानंतर शाळेचा फरशीचा भाग पूर्णपणे तडकलेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच, एका शाळेतील मध्यान्ह भोजनाची पाहणी केली असता काही खाद्यपदार्थांची पाकिटे मुदतबाह्य असल्याचे आढळून आल्याचा त्यांनी दावा केला.
दरम्यान, एका मुलाखतीत त्यांनी सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्याबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना भेटू दिले गेले नाही आणि त्यांचे ‘अपहरण’ करण्यात आले होते.
शाळेत मुदतबाह्य खाद्यपदार्थ?
शनिवारी दीपके यांनी त्यांच्या मूळ जिल्ह्यातील हिंगोलीमधील औंढा येथील एका सरकारी शाळेला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेल्या काही खाद्यपदार्थांची पाकिटे मुदतबाह्य असल्याचा त्यांनी दावा केला.
दीपके यांनी शाळेतील स्वच्छतागृहात पाण्याचा पुरवठा होत नसल्याचे आणि पाण्याचे फिल्टर खराब असल्याचेही निदर्शनास आणून दिले. त्यांनी शाळेत ठेवलेली मसाल्यांची पाकिटे माध्यम प्रतिनिधींना दाखवली. या पाकिटांची वापरण्याची मुदत फेब्रुवारीमध्येच संपली होती, असा त्यांनी दावा केला.
दीपके म्हणाले, “ज्या पाकिटांची वापरण्याची मुदत फेब्रुवारीमध्येच संपली होती, अशा पाकिटांपासून तयार केलेले अन्न विद्यार्थ्यांना दिले जात आहे. आता सप्टेंबर सुरू होणार आहे. मंत्र्यांच्या मुलांनाही याच पाकिटांपासून तयार केलेले अन्न दिले जाईल का? ही मुले गरीब कुटुंबांतील आहेत म्हणून त्यांना मुदतबाह्य मसाला खायला द्यायचा का?”
दीपके शाळेच्या पाण्याच्या टाकीवर चढले
CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी शाळेच्या पाण्याच्या टाकीवर चढून टाकीतील पाण्याचीही पाहणी केली. यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्याशी फोनवरून चर्चा केली.
अधिकाऱ्याशी बोलताना दीपके म्हणाले, “या खाद्यपदार्थांच्या पाकिटांचा गेल्या सहा महिन्यांपासून वापर केला जात आहे. फिल्टर आहे, पण तो काम करत नसल्यामुळे विद्यार्थी बोअरवेलचे पाणी पीत आहेत. स्वच्छतागृहातही पाणी नाही.” विद्यार्थ्यांशी प्राण्यांपेक्षाही वाईट वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दीपके म्हणाले, “शाळेत ८७ विद्यार्थ्यांसाठी केवळ दोन वर्गखोल्या आहेत, तर चार वर्गखोल्यांना मंजुरी मिळालेली आहे.” ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये असलेल्या मूलभूत सुविधांच्या कमतरता समोर आणण्यासाठी आणि सरकारची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यासाठी CJPने १५ ऑगस्ट रोजी ‘स्कूल ठीक करो’ अभियान सुरू केले आहे.
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत काय म्हणाले अभिजीत दीपके? बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत दीपके यांनी सोनम वांगचुक यांच्याबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, “सोनम वांगचुक यांना मॅनिप्युलेट केल्याचे बोलले जाते. आपल्या मुलाच्या वयाच्या व्यक्तीकडून ते मॅनिप्युलेट होऊ शकतात का? मी तर म्हणत होतो की, तुम्ही उपोषण सोडा. त्यावर त्यांनी मला विचारले की, तुम्ही उपोषण सोडण्याचा दबाव का आणत आहात?”
दीपके पुढे म्हणाले, “त्यांनी आपला जीव धोक्यात घालून देशाला जागरूक केले आहे. आज ही चळवळ सोनम सरांपेक्षाही मोठी झाली आहे. मात्र, या टप्प्यावर चळवळ पोहोचवण्याचे सर्वात मोठे श्रेय सोनम वांगचुक यांनाच जाते.” सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्याच्या घटनेबाबत दीपके म्हणाले, “जेव्हा सोनम सरांना घेऊन गेले, तेव्हा मला त्यांना भेटू दिले गेले नाही. त्यांचे अपहरण करण्यात आले होते.”
ते पुढे म्हणाले, “काही लोक म्हणत होते की सरकारमधील लोकांच्या हातून त्यांचे उपोषण सोडवण्यात आले. त्यांनी उपोषण सोडले, ते चांगलेच झाले. ते मरण पावले असते तर? आम्हालाही त्यांचे उपोषण सुटावे असेच वाटत होते.”