Post Office : पोस्ट कार्यालयात आधार दुरुस्ती सेवा ठप्प File Photo
हिंगोली

Post Office : पोस्ट कार्यालयात आधार दुरुस्ती सेवा ठप्प

ऑपरेटरअभावी नागरिकांचे हाल, मुख्य कार्यालयाचीही उदासीनता

पुढारी वृत्तसेवा

Aadhaar correction services at the post office have been stopped

वसमत, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारकडून डिजिटल इंडिया आधार सर्वांसाठी अशा योजना मोठ्या प्रमाणावर राबविल्या जात असताना वसमत शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयात मात्र आधार दुरुस्ती व आधार लिंकिंगसारख्या अत्यावश्यक सेवा आजही नागरिकांना उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे पोस्ट कार्यालयात आवश्यक यंत्रणा, संगणक, इंटरनेट सुविधा असूनही केवळ ऑपरेटर नसल्यामुळे ही सेवा सुरू करण्यात आलेली नाही.

आधार कार्ड हे आजच्या घडीला सरकारी योजना, बैंक खाते, शिधापत्रिका, शिष्यवृत्ती, पेंशन, लाडकी बहीण योजना, गॅस सबसिडी, मतदान यादी दुरुस्ती यांसारख्या अनेक कामांसाठी अत्यंत महत्त्वाचे दस्ताऐवज बनले आहे. मात्र वसमतकरांना आधारमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख दुरुस्ती किंवा मोबाईल नंबर लिंकिंगसाठी परगावी जाण्याची वेळ येत आहे. पोस्ट कार्यालयातील पोस्ट मास्तरांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आधार सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

मात्र ऑपरेटर उपलब्ध नसल्यामुळे सेवा सुरू करता आ लेली नाही. ऑपरेटर नियुक्तीसाठी खूप दिवसांपूर्वी मुख्य कार्यालयाकडे मागणी करण्यात आली आहे. परंतु अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे वसमत शहरासह तालुक्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. वृद्ध नागरिक, महिला, विद्यार्थी, शेतकरी यांना हिंगोली, परभणी किंवा खासगी केंद्रांकडे जावे लागत आहे.

खासगी आधार केंद्रांवर जादा शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी देखील नागरिकांकडून होत आहेत. सरकारी कार्यालयात मोफत किंवा नाममात्र शुल्कात मिळणारी सेवा बंद असल्याने सामान्य जन तेवर आर्थिक बोजा वाढत आहे. विशेष म्हणजे वसमत हे तालुक्याचे ठिकाण असून येथे हजारो नागरिक दररोज विविध कामांसाठी येतात. पोस्ट कार्यालय हे सर्वसामान्य नागरिकांचे विश्वासाचे केंद्र मानले जाते.

अशा ठिकाणी आधारसारखी मूलभूत सेवा उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त करत सरकार एकीकडे डिजिटल सेवा वाढवण्याच्या घोषणा करते, पण प्रत्यक्षात मात्र कर्मचारी नियुक्तीअभावी सेवा ठप्प आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व जाणकार नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधत तत्काळ ऑपरेटरची नियुक्ती करून आधार दुरुस्ती व लिंकिंग सेवा सुरू करण्याची मागणी करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT