8 robbers arrested for looting containers
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा
वसमत तालुक्यातील भेंडेगाव शिवारात फ्लिपकार्टचे पार्सल वाहतूक करणारा कंटेनर अडवून पार्सल लुटणाऱ्या ८ दरोडेखोरांना हिंगो लीच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिकअप, एक कार दोन मोबाइलसह २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अन्य दोघांचा शोध सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस पोलिस अधीक्षक कोकाटे यांच्यासह अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, विक्रम विठुबोने उपस्थित होते.
कुरुंदा पोलिस ठाण्यांतर्गत भेंडेगाव शिवारात ११ जून रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी कंटेनर अडवून चालक व वाहक यांना मारहाण केली. त्यानंतर कंटेनरमधील पार्सलची पाकिटे एका कारमध्ये टाकून पळविण्यात आली. या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, रामदास निरदोडे, गजानन बोराटे, उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, दिलीप मोरे, प्रविण आगलावे, आझम प्यारेवाले, प्रेम चव्हाण, पांडूरंग राठोड, नितीन गोरे, गजानन पोकळे, लिंबाजी वाहुळे हरिभाऊ गुंजकर, किशोर सावंत यांच्यासह पोलिसांचे पथक स्थापन केले होते. या पथकाने तांत्रीक तपास व गुन्-हेगारांची माहिती घेतल्यानंतर कंपनीच्या वाहनाचे जुने चालक नागनाथ राऊत, मारोती भुताडे (रा. नांदेड) यांना ताब्यात घेतले.
त्यांनी रिसोड कार्यालयातील माजी व्यवस्थापक सर्वेश धुत याला टीप दिल्याचे सांगितले. त्यानंतर आठ जणांनी कंटेनरचा पाठलाग करून लुटल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात पोलिसांनी ज्ञानेश्वर खानजोडे, परमेश्वर चौधरी, शंकर काळे, मंगेश काटे, मोहमद युसुफ, अभिषेक हलगे, सर्वेश धूत (सर्व रा. रिसोड), यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून फ्लिपकार्टचे लुटलेले १२४५ पार्सल व कार, एक पिकअप असा २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असून त्यासाठी पथके रवाना करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी स्पष्ट केले.