मराठवाडा

हिंगोली: आखाडा बाळापुरात जावयाच्या मारहाणीत सासूचा मृत्यू; पत्नी जखमी

अविनाश सुतार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : आखाडा बाळापूर येथे किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर संतापलेल्या जावयाने बाजेच्या ठाव्याने सासूचा खून केला. तर पत्नी व भाचीलाही मारहाण करून जखमी केल्याची घटना आज (दि.१६) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर फरार झालेल्या जावयाला पोलिसांनी कुर्तडी शिवारातून अटक केली आहे. लताबाई नागोराव खिल्लारे (वय ५०) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जालना जिल्हयातील बदनापूर भागातील अजय सोनुळे हा मागील दोन वर्षापासून पत्नीसह आखाडा बाळापूर येथील त्याच्या सासुरवाडीत राहतो. या ठिकाणी तो रोजमजुरीचे काम करतो. आज दुपारच्या सुमारास त्यांची घरात कुरबुर झाली. शाब्दीक चकमकीनंतर संतापलेल्या अजयने बाजेचा ठावा हातात घेऊन पत्नी सोनी सोनुळे भाची समीक्षा पाईकराव व सासू लताबाई खिल्लारे यांना मारहाण करण्यास सुरवात केली. अचानक झालेल्या मारहाणीमुळे तिघीही घाबरून गेल्या. या मारहाणीमध्ये लताबाई यांच्या डोक्यात बाजेच्या ठाव्याचा वर्मी घाव बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. तर सोनी व समीक्षा दोघीही जखमी झाल्या. या घटनेनंतर अजयने पळ काढला.

यावेळी आरडा ओरड झाल्यानंतर शेजारी असलेले नागरिक घटनास्थळी धावले. तसेच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, श्रीधर वाघमारे, जमादार नागोराव बाभळे, राजू जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिघांनीही उपचारासाठी आखाडा बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून तिघींना नांदेड येथे हलविण्यात आले. मात्र, रस्त्यातच लताबाई खिल्लारे यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेतील फरार अजय सोनुळे यास पकडण्यासाठी पोलिसांच्या पथकाने आखाडा बाळापूर ते वारंगा रस्त्यावर तसेच शेतात शोध मोहीम सुरु केली. यामध्ये कुर्तडी फाटा शिवारात तो पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT