मराठवाडा

Hingoli Rain: जिल्हयात दीड महिन्यानंतर बरसला मान्सून, १० मंडळात अतिवृष्टी; भिंत कोसळून दोघे जखमी

अविनाश सुतार

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : जिल्हयात पावसाळा सुरु होऊन तब्बल दीड महिन्यानंतर धुवाँधार मान्सून बरसला असून बुधवारी (दि.) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी ७१.३० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे नद्या प्रवाहित झाल्या. यामुळे कयाधू नदीला पुर आल्यामुळे हिंगोली ते समगा मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. तर हिंगोलीत भिंत कोसळून दोघे जण जखमी झाले आहेत.
जिल्हयात मान्सून सुरु होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसात शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या होत्या. त्यानंतर मोठ्या पावसाची प्रतिक्षा कायम होती. मात्र मागील चोविस तासात जिल्हयात धुवाँधार पाऊस (Hingoli Rain)  झाला आहे.

यामध्ये हिंगोली तालुक्यात तब्बल १०८ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. तर हिंगोली मंडळात १२० मिलीमिटर, नर्सी १२२, बासंबा ७७, डिग्रस कऱ्हाळे ११९, माळहिवरा ८१, खांबाळा १२६, तर वसमत तालुक्यातील टेंभुर्णी ७५ औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके ७८, जवळा बाजार ७६ तर औंढा नागनाथ मंडळात ७७ मिलीमिटर पावसाची नोंद झाली (Hingoli Rain) आहे.

या पावसामुळे कयाधू नदीला पुर आला असून हिंगोली ते समगा मार्गावर पुलावरून पाणी वाहात असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दुध विक्रेते व विद्यार्थ्यांना रेल्वेच्या रुळावरून हिंगोलीत यावे लागले. तर कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव पुलावरून पाणी वाहू लागले आहे.
तर हिंगोली ते जवळा पळशी रोडच्या पुलावरील डांबर रस्ता व कठडे वाहून गेले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. शहरातील सैलानीबाबा चौकातील घराची भिंत कोसळून दोघेजण जखमी झाले आहेत. घराची भिंत कोसळल्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT