हिंगोली: पुढारी वृत्तसेवा : शेतातील आखाड्याला आग लागल्याने एक बैल, एक गाय, तीन म्हशींसह चार वगार होरपळल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील सुरवाडी शिवारात आज (दि. १८) दुपारी १२.३०च्या सुमारास घडली. या आगीत धान्य, शेती अवजारे व एक दुचाकीही जळून खाक झाली. या दुर्घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे ९ लाख ६० हजारांचे नुकसान झाले आहे.
निशाणा येथील शेतकरी प्रकाश मालजी सावळे यांचे शेत औंढा नागनाथ तालुक्यातील सुरवाडी शिवारात आहे. त्यांच्या गट क्रमांक १० मध्ये असलेल्या आखाड्याला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तसेच हिंगोली नगर पालिकेचे अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. प्रखर उन्हामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होत होते. सुमारे दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत आखाड्यात बांधलेला एक बैल, एक गाय, तीन म्हशी व चार वगार अशी नऊ जनावरे होरपळली. तसेच आखाड्यावरील १० क्विंटल गहू, ८ क्विंटल ज्वारी, ३० क्विंटल सोयाबीन, २० क्विंटल हरभरासह इतर धान्य, शेती अवजार जळाली.
श्यामराव रामराव साळवे यांनी घटनेची माहिती कळविल्यानंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. त्यानुसार शेतकरी प्रकाश सावळे यांचे ९ लाख ६० हजाराचे नुकसान झाले आहे. तर याच आगीत श्यामराव सावळे यांची दुचाकी जळाली. आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
हेही वाचा