मराठवाडा

हिंगोली : गतिमंद मुलाकडून ७ वर्षीय मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

निलेश पोतदार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथे गतिमंद मुलाने एका सात वर्षीय मुलीवर अत्‍याचार केल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. अभ्‍यासाची उजळणी करून घेण्याच्या बहाण्याने गतिमंद मुलाने सात वर्षीय मुलीला शाळेच्या खोलीमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात आज (शुक्रवार) पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी गतिमंद मुलाला ताब्यात घेतले आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, धानोरा येथील एक सात वर्षीय मुलगी गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेजवळ खेळत होती. यावेळी गावातील एका गतिमंद अल्पवयीन मुलाने त्या मुलीला तुला उजळणी शिकवतो असे म्हणून तेथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या खोलीत नेले. त्या ठिकाणी उजळणी शिकवण्याचा बहाना करून तू उजळणी म्हण असे सांगितले. ती मुलगी उजळणी म्हणत असताना तुझी उजळणी चुकली असे सांगून त्याने मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, काही वेळानंतर त्या मुलीला त्रास होत असल्याने तिने घडलेला सर्व प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला. तिच्या कुटुंबीयांनी पहाटे थेट कळमनुरी पोलीस ठाणे गाठले. तिच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी गतिमंद व अल्पवयीन मुलाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, महिला पोलीस उपनिरीक्षक गजभारे, जमादार प्रशांत शिंदे, गजानन होळकर, नरवाडे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. अधिक चौकशी मध्ये तो मुलगा गतिमंद असल्याचे आढळून आले असून, त्याच्याकडे याबाबतचे प्रमाणपत्र देखील असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक गजभारे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT