file photo  
मराठवाडा

छत्रपती संभाजीनगरमध्ये टवाळखोरांची मस्ती; भररस्त्यात तरुणीचा हिजाब ओढत छेडछाड

backup backup

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मित्रासोबत बीबी का मकबरा पाहण्यासाठी गेलेल्या मुलीचा टवाळखोरांनी पाठलाग केला. कोणी तिचा हिजाब ओढला तर कोणी मोबाइल हिसकावला. भररस्त्यात तिच्याशी झटापट करीत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने तिला मारहाणही केली. कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे उडविणारा हा प्रकार बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसांपूर्वी घडला. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर बुधवारी (दि.२६) पोलिसांनी स्वत: फिर्यादी होत गुन्हा दाखल केला. तीन टवाळखोरांना ताब्यात घेत त्यांना पोलिसी खाक्या दाखविला.

छत्रपती संभाजीनगरात मागील काही दिवसांपासून महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एका विवाहितेला गाठून तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार करीत विवाहितेचा निर्घृण खून केल्याची घटना चिकलठाणा विमानतळाच्या भिंतीलगत घडली होती. ही घटना ताजी असतानाच दोन दिवसांत छेडछाडीचे तब्बल आठ गुन्हे दाखल झाले होते. २५ एप्रिल रोजी विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातील प्रा. अशोक बंडगर याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. त्याच दिवशी जिन्सी ठाण्यात एका नराधमाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद झाला. महिलांच्या संबंधित गुन्ह्यांचा आकडा सतत वाढत आहे. २६ एप्रिल रोजी कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडविणारा व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हरेश्वर घुगे यांनी गुन्हा दाखल केला.

व्हिडिओ व्हायरल; असे आहे नेमके प्रकरण

पोलिसांनी सांगितले, छत्रपती संभाजीनगर शहरातील एक मुलगी मित्रासोबतल बीबी-का-मकबरा पाहण्यासाठी गेली होती. तेथे आधीपासून असलेल्या टवाळखोरांची तिच्यावर नजर गेली. दरम्यान, तिच्यासोबत असलेला मित्र आणि ती वेगवेगळ्या धर्माचे असल्याचा त्यांना संशय आला. त्यामुळे टवाळखोरांनी आणखी काही साथीदारांना बोलावून घेतले. आपल्या आजुबाजुला टवाळखोर जमा होत असल्याचे त्या दोघांच्या लक्षात आले. त्यानंतर पीडितेसोबत फिरणाऱ्या तरुणाने तेथून काढता पाय घेतला. तरुणीही पायी घराकडे निघाली. तेव्हा पाच ते सहा जणांच्या टोळक्याने तिचा पाठलाग सुरु केला. तरुणी चालू लागताच टवाळखोरांनी तिला गाठले. तुझ्यासोबतचा मुलगा कोण होता?, तुझा मोबाइल दाखव, असे अनेक प्रश्न विचारून तिला घेरले. शिवीगाळ केली. त्याचवेळी कोणी तिचा हिजाब ओढला तर कोणी थेट मोबाईल हिसकावून घेतला. यादरम्यान, मुलगी जोरजोरात ओरडत मला सोडा, अशी विनंती करीत होती, पण टवाळखोरांपैकी कोणालाही तिची दया आली नाही. उलट त्यांनी तिला अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली.

नागरिकांमधून कोणीही पुढे सरसावले नाही

धक्कादायक म्हणजे भररस्त्यावर हा प्रकार सुरु होता. तेथून अनेकजण ये-जा करीत होते. मात्र, कोणीही तरुणीची सुटका केली नाही किंवा तरुणांना हा काय प्रकार सुरु आहे, याचा जाबदेखील विचारला नाही. मुलीच्या मदतीसाठी, तिच्या संरक्षणार्थ कोणीही पुढे आले नाही. भररस्त्यावर हे कृत्य होत असताना नागरिक एवढे शांत कसे?, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. कायद्याचा धाक निर्माण करणे जसे पोलिसांचे काम आहे तसेच महिला, मुलींचे संरक्षण करण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची आहे, हे कोणीही विसरू नये.

तिघांना ठोकल्या बेड्या

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर शहर पोलिसांनी बाजू मांडली. तरुणीसह तिच्या पालकांना तक्रार देण्याबाबत सांगितले मात्र, त्यांनी तक्रार देण्यास नकार कळविला. त्यावर पोलिसांनी स्वत:हून फिर्यादी होत हे प्रकरण बेगमपुरा पोलिस ठाण्यात दाखल केले. व्हिडिओवरून टवाळखोरांची ओळख पटवित आरोपींचा शोध सुरु केला. उस्मानपुरा पोलिसांनी शेख गयाज ऊर्फ बब्बू शेख रियाज (30, रा. फुलेनगर, उस्मानपुरा) याला ताब्यात घेतले. तो मजुरी करतो. तर, बेगमपुरा पोलिसांनी नदीम खान फिरोज खान (21, रा. मकबरा रोड, बेगमपुरा) आणि सुफियान खान मुसा खान (21, रा. आसेफिया कॉलनी) या दोघांना अटक केली. सुफियान हा मेकॅनिक तर नदीम हा मजूर आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक तावरे यांनी दिली.

हेही वाचंलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT