छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : चेंबरमध्ये काम करण्यासाठी उतरलेल्या चार सफाई कामगार गुदमरून अत्यवस्थ झाल्याचा प्रकार घडला आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (दि. ८) सकाळी ११ वाजता सलीम अली सरोवर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात येत आहे.
अंकुश बाबासाहेब थोरात, रावसाहेब सदाशिव घोरपडे (दोघे रा. हिमायत बाग) अशी मृतांची नावे आहेत. विष्णू उगले, बाळू विश्राम खरात (रा. हिमायत बाग)हे दोघे अत्यवस्थ आहेत.
ड्रेनेज चोकअप होत असल्याची वारंवार तक्रार करूनही महापालिका वॉर्ड अभियंता आणि मुख्य कार्यालयाकडून एकदाही स्वच्छतेचे काम करण्यात आले नाही. अखेर हतबल होऊन परिसरातील काही नागरिकांनी स्वखर्चाने चोकअप होणारे ड्रेनेजची सफाई करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी खासगी कामगार लावले. परंतु काम सुरू असताना यातील दोघांचा चेंबरमधील उग्र गॅसमुळे गुदमरून मृत्यू झाला. मनपा वॉर्ड कार्यालयाने वेळीच येथील नागरिकांच्या तक्रारीवरून ड्रेनेज स्वच्छ केले असते. तर या दोन्ही खाजगी कामगारांचा जीव वाचला असता. मात्र, असे असतानाही मनपा प्रशासनाकडून या घटनेशी संबंध नसल्याचे सांगण्यात येत आहे.
सलिम अली सरोवर परिसरातील मनपाच्या एसटीपी प्लांटजवळील ड्रेनेज लाईनचे काम करण्यासाठी मनपा वॉर्ड अभियंता विभागाने कुठलेच कामगार पाठविलेले नव्हते. हे काम खासगी व्यक्तींद्वारे केले जात होते. त्यामुळे मृत पावलेले मजूर महापालिकेचे नसून ते खासगी असून या घटनेशी मनपाचा कुठलाच संबंध नाही, असे मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितले.
ड्रेनेजच्या चेंबरमध्ये सफाई काम करताना दोन खासगी कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण अत्यवस्थ आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून यात सफाई कामगार कायदा २०१३ मध्ये स्पष्ट नमुद केले आहे की, अशा प्रकारचे काम जर खासगी व्यक्तीद्वारे केले जात असेल आणि यात काही दुर्घटना घडली. तर काम करून घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. यात दोन वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. शिवाय यामध्ये राज्य शासनाने मृत व जखमींना मोबदला देणे बंधनकारक आहे. जोपर्यंत या कायद्यानुसार प्रक्रिया होणार नाही. तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.
हेही वाचा