येरमाळा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री येडेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवानिमित्त मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. रंगीबेरंगी दिव्यांच्या मनमोहक सजावटीमुळे रात्रीच्या वेळी मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. या रोषणाईमुळे परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
मंगळवार हा देवीचा वार आणि नवरात्रोत्सवाची तिसरी माळ असल्याने श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. ऑक्टोबर महिन्यातील वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर दिवसा दर्शनासाठी येण्याऐवजी रात्री दर्शन घेण्याकडे भाविकांचा कल वाढला आहे. महिला भाविकही श्रद्धेने देवीच्या चरणी नतमस्तक होऊन सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना करत आहेत. मंदिराच्या कळसासह दर्शन सभामंडप, मंदिराच्या पायऱ्यांवरील शेड आदी ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
मंदिराच्या पायरी परिसरात साकारलेला कालिका माता मंदिराचा विद्युत रोषणाईतील देखावा यंदाच्या नवरात्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत असून, अनेक जण मोबाईलमध्ये छायाचित्रे आणि चित्रफिती टिपण्यात गुंग असल्याचे दिसत आहे. सामाजिक माध्यमांवरही या देखाव्याची चर्चा होत आहे.
विविध रंगांच्या प्रकाशाने उजळलेले मंदिर आणि परिसरातील सजावट पाहण्यासाठी संध्याकाळनंतर भाविकांची वर्दळ वाढत आहे. ‘आई राजा उदं उदं’, ‘येडु सरीचा उदं उदं’ अशा जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून जात आहे. देवीवरील अढळ श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभाव यांचा संगम नवरात्रोत्सवात अनुभवायला मिळत आहे.
गाभाऱ्यात फुलांपासून शेषनागाची सजावट
श्री येडेश्वरी देवीच्या गाभाऱ्यात मंगळवारी देवीच्या विरुद्ध दिशेला असलेल्या एका प्रतिमेभोवती फुलांपासून शेषनागाची आकर्षक सजावट करण्यात आली होती. दर्शनासाठी आलेले भाविक ही सजावट पाहण्यासाठी थांबत होते. फुलांच्या या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले.