Woman sexually assaulted on the pretext of marriage
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यातील बेंबळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात रा-हणाऱ्या २६ वर्षीय विवाहित महिलेवर गावातीलच एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला व तिच्या पतीमध्ये घरगुती वाद व भांडणे होत होती. तसेच पती काही काळापासून तिच्यासोबत राहत नव्हता. या परिस्थितीचा गैरफायदा घेत गावातील एका तरुणाने १२ मार्च २०२० पासून ते २२ मे २०२५ पर्यंत विविध ठिकाणी लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याच्याकडे लग्नासाठी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
नंतर पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर आरोपीने तिला तक्रार केल्यास जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली आणि लग्न करण्यास तसेच तिची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. पीडित महिलेने अखेर बेंबळी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे.