वाशी : हरवलेले मोबाईल शोधून काढल्यानंतर संबंधित धारकांना मोबाईल सुपूर्द करताना पोलिस अधिकारी व कर्मचारी.  pudhari photo
धाराशिव

Dharashiv Crime : मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळणार कधी?

धाराशिव : आठवडे बाजार, देशपांडे स्टँड परिसरातील तक्रारींत वाढ

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव/वाशी : वाशी शहर व वाशी पोलिस ठाणे हद्दीतील नागरिकांचे गेल्या काही महिन्यांत हरवलेले सुमारे 4 लाख रुपये किमतीचे 15 मोबाईल वाशी पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारे शोधून काढत संबंधित मूळ मालकांच्या ताब्यात सुपूर्द केले. दरम्यान, वाशी पोलिसांसारखीच मोहीम राबवून धाराशिव शहर पोलिस असे धाडस कधी दाखवणार, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी वाशी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. तांत्रिक विश्लेषण आणि प्रभावी पाठपुराव्याच्या माध्यमातून मोबाईलचा माग काढण्यात यश आले. जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

वाशी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अजयसिंह भाळे तसेच पोलिस कॉन्स्टेबल गणेश खैरे, विठ्ठल मलंगनेर, नासिर सय्यद आणि दादा औसारे यांनी विशेष परिश्रम घेऊन हरवलेले मोबाईल शोधून संबंधित धारकांना परत मिळवून दिले.यावेळी पोलिस निरीक्षक शंकर शिंदे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, मोबाईल हरवल्यास तत्काळ संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवून आवश्यक माहिती द्यावी. त्यामुळे मोबाईल शोधण्यास मदत होते.

पोलिस निरीक्षक शंकर शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीविरोधात प्रभावी कारवाई सुरू ठेवली असून महामार्गावरील लुटमारीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच चोरीस गेलेले आणि हरवलेले अनेक मोबाईल शोधून मालकांना परत देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाविषयी समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

केवळ ‌‘होमगार्ड‌’स्‌‍ घालतात गस्त

देशपांडे स्टँड येथे भरणारी दैनंदिन भाजीमंडई ही मोबाईल चोरांसाठी कुरण आहे. वास्तविक येथे पोलिसांनी किमान सकाळी 2 तास तरी गस्त आवश्यक आहे. प्रत्यक्षात महिन्यातून केव्हा तरी एकदा होमगार्ड फिरत असलेले दिसतात. त्यांच्या भरवशावर मोबाईल सुरक्षा कशी सांभाळली जाईल यावर विचारच न केलेला बरा.

हजारोंच्या मोबाईलची चोरी...मात्र नोंद हेोते गहाळची..!

मोबाईल वापरत असताना आता स्मार्ट फोन गरजेचा झालेला आहे. सर्व बिले भरण्याबरोबरच बँकिंग व्यवहारही त्यावरून होतात. त्यामुळे उत्तम दर्जाचा फोन घ्यायचा असेल तर किमान 15 ते 20 हजार रुपयांपासून किमती असतात. अनेकांनी फोन तर 30 ते 40 हजार रुपयांच्या पुढचे असतात. असा फोन चोरट्यांनी पळविला तर संबंधित ग्राहकाला मोठा भुर्दंड होतो. त्यात पोलिस पुन्हा गुन्हा दाखल करण्याऐवजी मिसिंग दाखल करून गहाळ प्रमाणपत्र देतात. परिणामी मोबाईल चोरीचा तपास कुठपर्यंत आलाय हे कोणालाच समजत नाही. किंबहुना तो तपासच होतो की नाही याबाबत अनेकांना शंका आहे.

वाशी पोलिसांचा आदर्श धाराशिव पोलिस घेणार का?

वास्तविक धाराशिव, तुळजापूर, उमरगा आणि कळंब ही जिल्ह्यातील मोठी शहरे आहेत. या ठिकाणी मोबाईल चोरी व मोबाईल हरविण्याच्या घटनांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. विशेषतः धाराशिव शहरात अशा तक्रारींची संख्या मोठी असल्याचे दिसून येते. मात्र, वाशीसारख्या तुलनेने छोट्या पोलिस ठाण्याने तांत्रिक मदतीच्या आधारे हरवलेले आणि चोरीस गेलेले 15 मोबाईल शोधून संबंधित मालकांना परत मिळवून दिले आहेत. यामुळे पोलिस यंत्रणेची इच्छाशक्ती, पाठपुरावा आणि तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर केल्यास नागरिकांना दिलासा देणे शक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाशी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी हे काम यशस्वीपणे करू शकत असतील, तर धाराशिवसारख्या मोठ्या शहरातील पोलिस ठाण्यांनाही अशी मोहीम प्रभावीपणे राबविणे अवघड नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मोबाईल चोरी व हरविलेल्या मोबाईलच्या प्रकरणांमध्ये नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी वाशी पोलिसांचा आदर्श धाराशिव शहरातील पोलिस ठाणे घेणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

देशपांडे स्टँडवर चोरांचा सुळसुळाट

धाराशिव शहरातील देशपांडे स्टँड भाजी मंडईत दररोज सकाळी ग्राहकांची भाजपाला खरेदीसाठी गर्दी असते. प्रत्येक रविवारी तसेच गुरुवारी येथे मोठी गर्दी असते. याचाच गैरफायदा मोबाईल चोरटे सातत्याने घेत असतात. 31 मे रोजी एकाच दिवशी तासाभरात तीन ते चार मोबाईल येथून चोरीस गेले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रारीही दाखल आहेत. त्यावर पोलिसांनी केवळ ‌‘मिसिंग‌’ दाखल करून संबंधितांना पत्रे दिली. त्या मोबाईलचा तपास मात्र अजून लागलेला नाही. वास्तविक सायबर क्राईम ब्रँच कार्यान्वित असताना तांत्रिक विश्लेषणातून हे माबाईल शोधण्याची तसदी पोलिस घेत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होतआहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT