Private ambulance charges pudhari photo
धाराशिव

Private ambulance charges : रुग्णवाहिका सेवेचा मनमानीचा 'सायरन'

सेवाभाव हरवला; दर नियंत्रण, नियमित तपासणीची नागरिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

शंकर बिराजदार

उमरगा : रुग्णवाहिका ही मूलत: सेवाभावी व्यवस्था मानली जाते. 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर खासगी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी या तत्त्वाला हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे. जास्तीत जास्त नफा मिळविण्याच्या उद्देशाने रुग्णवाहिका सेवेचे व्यापारीकरण होत असून, आजारी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या अडचणींचा गैरफायदा घेतला जात असल्याची बाब समोर येत आहे.

उमरगा शहरात उपजिल्हा रुग्णालय, स्वतंत्र ट्रॉमा केअर सेंटर तसेच सुमारे ५० ते ६० खासगी रुग्णालये आहेत. त्यामुळे दररोज विविध आजारांवरील उपचार, प्रसूती, अपघात तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील जखमी रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होतात. उपचारानंतर रुग्णाला घरी सोडणे, अन्य रुग्णालयात हलविणे किंवा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास मृतदेह गावी नेण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता भासते.

शासकीय १०८ रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असली तरी वाहनांची मर्यादित संख्या व आवश्यक सुविधांचा अभाव यामुळे अनेकांना खासगी रुग्णवाहिकेवर अवलंबून राहावे लागते.याच परिस्थितीचा फायदा घेत काही खासगी रुग्णवाहिका चालकांकडून मनमानी भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.

घरातील सदस्याच्या गंभीर आजारपणामुळे हतबल झालेल्या नातेवाइकांकडे त्यावेळी दुसरा पर्याय नसल्याने त्यांना मागेल तेवढे भाडे देण्याशिवाय पर्याय राहत नाही.खासगी रुग्णवाहिकांसाठी शासनाने एकसमान दर निश्चित केलेले नसल्याने प्रत्येक चालक किंवा मालक आपल्या पद्धतीने भाडे आकारत असल्याचे दिसून येते.

परिणामी,सेवाभावाऐवजी व्यवसायाला प्राधान्य मिळत असून रुग्णवाहिका सेवेचे खुलेपणाने बाजारीकरण झाल्याचे चित्र आहे. या व्यवसायातील वाढत्या आर्थिक फायद्यामुळे अनेक जण या क्षेत्रात उतरले असून, त्याचा सर्वाधिक फटका आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना बसत आहे.

रुग्णवाहिकांच्या नोंदीत विसंगती

रुग्णवाहिकेचे पासिंग झाल्यानंतर त्याची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) केली जाते. मात्र, काही खासगी वाहनांचे रुग्णवाहिकेत रूपांतर करून त्यांचा व्यावसायिक वापर सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अधिकृत नोंदी आणि प्रत्यक्ष रस्त्यावर धावणाऱ्या रुग्णवाहिकांच्या संख्येत विसंगती असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशा वाहनांची नियमित तपासणी होत नसल्याने नियमभंग करणाऱ्यांना मोकळे रान मिळत असल्याचा आरोप होत आहे.

बेकायदा व्यवसायाचाही संशय

उमरगा शहरात यापूर्वी एका रुग्णवाहिकेतून विदेशी बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे काही रुग्णवाहिकांचा वापर बेकायदा व्यवसायांसाठी होत असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. अशा वाहनांची कागदपत्रे, नोंदणी व वापराची सखोल पडताळणी करून नियमित तपासणी मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT