Dharashiv News
उमरगा : शंकर बिराजदार
आजच्या डिजिटल युगात जिथे मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, तिथे उमरगा शहरातील एका विवाह सोहळ्याने समाजासमोर एक नवा आणि प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. जिल्हा परिषद शाळेतील मराठी विषयाचे शिक्षक गोविंद पाठक यांनी आपल्या मुलीच्या लग्नात पारंपरिक भेटवस्तू किंवा वायफळ खर्चाला फाटा देत, पाहुण्यांना पुस्तकांची भेट देऊन मराठी भाषा संवर्धनाचा अनोखा संदेश दिला.
शहरात जिल्हा परिषद शाळेतील मराठी विषयाचे शिक्षक गोविंद पाठक यांची मुलगी शुभदा आणि पियुष इनामदार यांचा रविवारी, (दि २६) विवाह सोहळा पार पडला. पाठक यांनी आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यात पारंपरिक भेट वस्तू ऐवजी पुस्तकांची भेट दिली. मंगल कार्यालयातील दर्शनी भागात एक मोठा बॅनरवर मध्यभागी संत ज्ञानेश्वर महाराज यांचे तर दोन्ही बाजूला पु.ल. देशपांडे कुसुमाग्रज, सुधा मूर्ती, साने गुरुजी, जी.ए.कुलकर्णी, आचार्य अत्रे, एस.एल. भैरप्पा, वि. स.खांडेकर, राम गणेश गडकरी, शांता शेळके, रणजित देसाई, दिलीप प्रभावळकर आदींच्या आकर्षक चित्राची प्रभावी मांडणी करण्यात आली होती. तर समोरच्या बाजूला कथा, कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्रे आणि संदर्भ ग्रंथ अशा विविध लेखकांच्या पुस्तकांची मांडणी केली होती.
विशेषतः मराठी भाषेच्या सध्याच्या दुरावस्थेवर भाष्य करणाऱ्या फलकांवरील 'सध्या मराठी भाषेची प्रचंड दुरवस्था झाली आहे. जाणाऱ्या प्रत्येक दिवसा गणिक मराठी शाळा आणि भाषा मरणासन्न अवस्थेतून जात आहे, शिव छत्रपतींच्या, ज्ञानोबा, तुकोबांच्या मराठीला आपली अस्तित्वासाठी झगडावं लागत आहे. आजकाल घरात मराठी पुस्तकांसाठी हक्काची जागा सुद्धा नाही आहे. तर मित्रांनो आजच्या दिवशी आपण संकल्प करुया वर्षाला किमान एक मराठी पुस्तक वाचूया! अभिजात भाषेचा पोकळ अभिमान न बाळगता, मराठी भाषा संवर्धन आणि प्रसारासाठी प्रयत्न करुयात आपल्या मित्रपरिवार, आप्तेष्ट यांना मराठी पुस्तक भेट देऊयात.' या मजकुराने उपस्थितांच्या मनावर ठसा उमटवला.
पाठक यांच्याकडेही मोठा पुस्तकसंग्रह असून मराठी भाषा आणि वाचनाची गोडी समाजात रुजवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला. अनावश्यक खर्च टाळून समाज हिताचा संदेश देणारा हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरत आहे. वाचन संस्कृती आणि मराठी भाषेच्या जतनासाठी पाठक आणि त्यांच्या परिवाराने उचललेले हे पाऊल निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.
“विवाह हा केवळ समारंभ नसून समाजाला दिशा देण्याची संधी आहे. आजच्या डिजिटल युगात वाचनाची सवय कमी होत आहे, ती पुन्हा रुजवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न केला. प्रत्येकाने वर्षाला किमान एक पुस्तक वाचावे, हीच अपेक्षा. मराठी भाषा आणि साहित्य जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”गोविंद पाठक, शिक्षक