

ठाणे : डिजिटल युगाच्या वाढत्या प्रभावामुळे तरुण पिढी पुस्तकांपासून दूर जात असल्याची चिंता व्यक्त होत असताना, वाचन संस्कृती पुन्हा रुजवण्याची गरज अधोरेखित होत आहे. आज 23 एप्रिल- जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने साहित्यिक, लेखक आणि अभ्यासकांनी तरुणांना वाचनाच्या सवयींकडे वळवण्यासाठी विविध उपाय सुचवले आहेत. “तरुण पिढी पुस्तकांपर्यंत पोहोचत नसेल, तर पुस्तके त्यांच्या पर्यंत पोहोचली पाहिजेत,” असा ठाम सूर यावेळी उमटला.
मोबाईल, सोशल मीडिया आणि झटपट माहितीच्या सवयींमुळे सखोल वाचन कमी होत चालले आहे. वाचनामुळे विचारशक्ती विकसित होते, व्यक्तिमत्त्व घडते आणि समाजाबद्दल संवेदनशीलता निर्माण होते, असे साहित्यिकांचे मत आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालयांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी वाचन स्पर्धा, लेखक-विद्यार्थी संवाद आणि ग्रंथालय उपक्रम यांसारख्या माध्यमांचा प्रभावी वापर करण्याची गरज व्यक्त होत आहे. पाठ्यपुस्तकांपलीकडे विविध साहित्य वाचण्याची सवय लागणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
आजच्या बदलत्या काळात ई-बुक्स आणि ऑडिओबुक्स यांसारख्या आधुनिक साधनांचा वापर करूनही वाचनाची सवय वाढवता येऊ शकते. मात्र पारंपरिक पुस्तक वाचनातून मिळणारा अनुभव आणि चिंतनाची प्रक्रिया अधिक प्रभावी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. ग्रामीण भागात वाचनाची आवड टिकून असली तरी शहरांमध्ये ती कमी होत असल्याने सार्वजनिक ग्रंथालयांचे जाळे मजबूत करणे आणि वाचनासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले.
आजची पिढी पारंपरिक छापील पुस्तकांपेक्षा किंडल, ऑडिओबुक्स आणि पीडीएफ स्वरूपात वाचन करणे पसंत करते या माध्यमांमुळे तरुणांमध्ये वाचनाची नवीन लाट आली असून, पुस्तकांची निवड सामाजिक संवादातून केली जात आहे. मनोरंजन आणि माहितीसोबतच, मानसिक शांतता आणि तणावमुक्तीसाठी वाचनाचा उपयोग केला जाऊ लागला आहे ही चांगली गोष्ट आहे. ग्रंथालयांची जागा डिजिटल लायब्ररीने घेतली आहे. जिथं ई-पुस्तकं एका क्लिकवर उपलब्ध आहेत. तरुण पिढी निवडक, वैचारिक आणि कथा-कादंबरीसोबतच आत्मचरित्र, वैयक्तिक विकास या विषयांवर अधिक भर देताना दिसते आहे.मध्यम कोणतेही असले तरी वाचन करणे हा मुद्दा महत्त्वाचा आहे.
डॉ.महेश केळुसकर, ज्येष्ठ साहित्यिक
पूर्वी वाचनालये कमी होती; मात्र आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ग्रंथालये उपलब्ध आहेत. तरीही वाचकसंख्या घटत असल्याची खंत वाटते. मुलांमध्ये लहानपणापासूनच वाचनाची गोडी निर्माण व्हायला हवी. शाळांमध्ये आठवड्यातून किमान दोन वेळा वाचनाचा तास ठेवणे आवश्यक आहे. ग्रंथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत. शाळा आणि महाविद्यालयांनी आपली ग्रंथालये समृद्ध करून वाचनाची सवय लावायला हवी. पुस्तकाच्या वाचनानंतर मनन करणे महत्वाचे असते. ते ई बूक्समुळे काहीसे शक्य होत नाही त्यामुळे ई-बुक्स वाढत असले तरी सखोल वाचनासाठी पुस्तकांना पर्याय नाही.
अशोक बागवे, ज्येष्ठ कवी
वाचनाची सुरुवात घरातून व्हायला हवी. पालकांनी स्वतः वाचनाची सवय जोपासून मुलांना प्रेरणा द्यावी. दररोज वर्तमानपत्र वाचनाची सवय लावल्यास मुलांमध्ये नियमितता येते. त्यानंतर पुस्तकांची ओळख करून द्यावी. विद्यार्थ्यांनी दरमहा थोडी रक्कम पुस्तकांसाठी खर्च करणे शक्य आहे. डिजिटल साधने पर्याय म्हणून उपयोगी असली तरी हातात पुस्तक घेऊन वाचन करण्याचा आनंद वेगळाच असतो. ही सवय टिकवणे आवश्यक आहे.
बाळ कांदळकर, कोमसाप, ठाणे शाखा अध्यक्ष
अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तकं वाचणाऱ्यांची संख्या कमी आहे. अनेकांना काय वाचावे आणि कधी वाचावे याचे मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे योग्य दिशा दर्शनाची गरज आहे. वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी दर्जेदार साहित्याची ओळख करून देणे महत्त्वाचे आहे. रणजित देसाई यांचे श्रीमंतयोगी, भानू काळे यांचे बदलता भारत, सदानंद मोरे यांचे लोकमान्य ते महात्मा, अच्युत गोडबोले यांचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या पुस्तकांपासून सुरुवात करावी. अशा पुस्तकांमुळे विचारविश्व समृद्ध होते.
डॉ. मिलिंद कुलकर्णी, तरुण लेखक