उमरगा येथे काँग्रेसच्या मोर्चात करपलेले सोयाबीन हातात घेऊन सहभागी झालेले शेतकरी. pudhari photo
धाराशिव

Umarga farmers protest : करपलेल्या सोयाबीनसह शेतकऱ्यांचा एल्गार

उमरगा : काँग्रेस पक्षाचा बैलगाडी, ट्रॅक्टरसह तहसीलवर विराट मोर्चा, मदतीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

उमरगा : तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, पीकविमा व अनुदानाच्या प्रलंबित रकमा द्याव्यात, तसेच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि. ११) बैलगाड्या व ट्रॅक्टरसह तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.

शहरातील हुतात्मा स्मारकापासून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या मोर्चात शेतकरी बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि करपलेले सोयाबीन हातात घेऊन सहभागी झाले होते. ‘कोरडा दुष्काळ जाहीर करा’, ‘शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’, अशा घोषणांसह शासनविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. यावेळी अश्लेष मोरे, उमेश राजेनिंबाळकर, उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, अ‍ॅड. दिलीप सगर, रेखा सूर्यवंशी आदींनी मार्गदर्शन केले. त्यानंतर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरिपातील पिके करपून शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी. तसेच पीकविमा आणि अनुदानाच्या प्रलंबित रकमा अदा कराव्यात. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात; अन्यथा तहसील कार्यालयाच्या आवारात जनावरे बांधण्याचा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे यांनी दिला.

केंद्र व राज्य सरकारकडून गेल्या बारा वर्षांपासून शेती व शेतकऱ्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. शेतकरी संकटात असताना आमदार, खासदार पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहेत, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी केला. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर रुमणे हातात घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

मोर्चात नगरसेवक अभिजीत मोरे, विशाल कानेकर, बाबा मस्सके, सतीश जाधव, अमित रेड्डी, अभिषेक औरादे, दादासाहेब गायकवाड, नानाराव भोसले, विजय दळगडे आदी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरम्यान, मोर्चातील शेतकऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बैलगाड्यांचे बैल सोडून गाड्या रस्त्यावर आडव्या उभ्या केल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT