

जालना: परतूर शहरात महावितरणने राबवलेल्या धडक मोहिमेत सात ग्राहक आकडे टाकून वीजचोरी करताना व मीटरमध्ये फेरफार करताना पकडण्यात आले. दीड लाखांची वीजचोरी केल्याप्रकरणी सर्व आरोपींवर परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महावितरणच्या परतूर शाखेचे सहायक अभियंता राधेश्याम कुमावत व त्यांचे सहकारी जावेद शेख, सचिन जईद, सुनील हरकल व नौशाद सय्यद यांनी परतूर शहरातील विविध भागात वीजग्राहकांच्या जोडणीची तपासणी केली. यात काही ग्राहक लघुदाब वाहिनीवर आकडा टाकताना व मीटरमध्ये फेरफार करताना आढळले.
या ग्राहकांनी वीजचोरी करून महावितरणचे नुकसान केले. यात सन्मित्र कॉलनी येथील सविता रामप्रसाद शेळके या ग्राहकाने १६ हजार ८९०, भाऊराव उमाजी सोनटक्के याने ८हजार २७०, ज्ञानेश्वर बापुराव गायकवाड याने १८ हजार ६१०, आकाश बापुराव गायकवाड याने १९ हजार १०, आंबा रोड येथील सय्यद महमद अली सय्यद मुसा याने २२हजार ३४०, सय्यद जहुर नुर कादरी याने ५० हजार ३८० व सय्यद मुनीर अहेमद सय्यद झहुर कादरी याने १८हजार ७० रुपयांची वीजचोरी केल्याचा आरोप आहे.
वीज चोरी प्रकरणात सात ग्राहकांनी ९ हजार २०० युनिट वीजचोरी केली. त्यामुळे १ लाख ५३हजार ५८० रुपयांचे नुकसान झाले. एवढ्या रकमेचे वीजचोरीचे बिल व ३४ हजार रुपयांचे तडजोड शुल्क भरण्यास टाळाटाळ केली. सहायक अभियंता राधेश्याम कुमावत यांच्या फिर्यादीवरून आरोपींवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.