पारगाव येथे अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला  (Pudhari Photo)
धाराशिव

Uddhav Thackeray | माझ्या हातात सत्ता नाही, पण कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी : उद्धव ठाकरे

Marathwada Flood | ठाकरे यांचा वाशी तालुक्यातील पारगाव येथे अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा

पुढारी वृत्तसेवा

Uddhav Thackeray Dharashiv visit

भूम : वाशी तालुक्यातील पारगाव येथे अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून सरकारवर तीव्र टीका केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत आत्महत्येचा विचार सोडून लढा देण्याचे आवाहन केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, “सरकारने एकरी केवळ ३४०० रुपयांची मदत जाहीर केली आहे, पण ही रक्कम शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना किमान एकरी ५० हजार रुपये मदत देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना जमीन दुरुस्त करायला पाच वर्ष लागणार आहेत, एवढा काळ ते कर्ज कसे फेडणार? म्हणूनच आम्ही ठरवले आहे की या सरकारकडून कर्जमाफी करून घ्यायची.”

ते पुढे म्हणाले, “कर्जवसुलीच्या नोटिसा, एसएमएस आले असतील तर ते आमच्याकडे पाठवा. ओला दुष्काळ व कर्जमाफीसाठी आम्ही पूर्ण ताकदीनं प्रयत्न करू. वेळ आली तर मी तुमच्या सोबत रस्त्यावर उतरणार आहे. पण तुम्ही कोणीही आत्महत्या करू नका. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”

या दौऱ्यात शेतकऱ्यांनी सोयाबीनसह विविध पिकांचे झालेले प्रचंड नुकसान ठाकरे यांना दाखवले. उद्धव ठाकरे यावेळी भावनिक होत म्हणाले की, “सध्या माझ्या हातात सत्ता नाही, पण तुमचं दुःख वाटून घेण्यासाठी आलो आहे. तुमच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरायला आम्ही तयार आहोत.”

या पाहणी दौऱ्यात खासदार संजय राऊत, खा. ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, चंद्रकांत खैरे, आ. प्रविण स्वामी, रणजित पाटील, प्रशांत चेडे, जिनत सय्यद, भूम तालुका प्रमुख अनिल शेंडगे, मेघराज पाटील, दिलीप शाळू महाराज, भास्कर वारे, चेतन बोराडे, दीपक मुळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT