Uddhav Thackeray's criticism of Chief Minister Devendra Fadnavis
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून, गुरुवारी तालुक्यातील करजखेडा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत देवेंद्र फडणवीस यांच्यावर फसवे मुख्यमंत्री म्हणून जोरदार टीका केली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा म्हणणारे फडणवीस आता कुठे आहेत, असा सवाल त्यांनी केला.
ठाकरे यांनी यावेळी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या फडणवीस यांच्या जुन्या ऑडिओ क्लिपचा उल्लेख करत सांगितले की, "त्या क्लिपमध्ये फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करण्याचे आश्वासन दिले होते. पण आजपर्यंत ते आश्वासन पूर्ण झाले नाही. सातबारा कोरा म्हणणारा कुठे गेला रे चोरा?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी ठाकरे म्हणाले, "जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, पीकविमा मिळत नाही, तोपर्यंत महायुतीला मत देऊ नका. कर्जमाफी करा हा काय टोमणा आहे का? मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरे टोमणा मारतात म्हणतात, पण हा टोमणा नाही, हा शेतकऱ्यांचा न्यायाचा आवाज आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.
अतिवृष्टीमुळे गेल्या दोन महिन्यांत मराठवाड्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सरकारने जाहीर केलेल्या ३२ हजार कोटींच्या मदतीबाबत ठाकरे यांनी शंका उपस्थित केली. "ही मदत खरोखर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का?" असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारला धारेवर धरले.
या संवाद कार्यक्रमाला माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटीद्वारे ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थेट संवाद साधत सरकारला जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला.