

धाराशिव : जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंध मोहिमेंतर्गत चाईल्ड हेल्पलाईन पथकाने दोन बालविवाह रोखण्यास यश मिळविले आहे. उमरगा तालुक्यातील एकुरगा व धाराशिव तालुक्यातील जहागीरदार वाडी येथे हे बालविवाह होणार होते.
एकुरगा येथील १७ वर्षीय व जहागीरदार वाडी येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलींचे विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती चाईल्ड हेल्पलाईनला मिळताच तातडीने दोन्ही ठिकाणी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली. तपासणीत दोन्ही बालिकांचे वय विवाहासाठी अपुरे असल्याचे स्पष्ट झाले.
या मोहिमेत अशोक चव्हाण, अभयसिंह काळे, पल्लवी पाटील, अमर भोसले यांच्यासह ग्रामसेवक दयानंद कोळी (एकुरगा) व ए. बी. माने (जहागीरदार वाडी) तसेच दोन्ही गावांतील ग्राम बाल संरक्षण समित्यांचे सदस्य यांनी सक्रिय सहभाग घेतला. यादरम्यान दोन्ही बालिकांचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. बालविवाह न करण्याबाबत त्यांच्याकडून हमीपत्र व पंचनामा घेण्यात आला. दोन्ही बालिकांना बालकल्याण समिती, धाराशिव समोर सादर करण्यात आले असून समितीच्या आदेशानुसार जहागीरदार वाडी येथील बालिकेस 'आपलं घर' बालगृह, नळदुर्ग येथे दाखल करण्यात आले. जिल्ह्यात कुठेही बालविवाहाची माहिती मिळाल्यास तातडीने चाईल्ड हेल्पलाईन १०९८ किंवा बाल संरक्षण कक्ष यांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुलीचे विवाहाचे किमान वय १८ वर्षे आणि मुलाचे २१ वर्षे असणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही विवाह कायदेशीरदृष्ट्या अवैध ठरले. तत्काळ हस्तक्षेप करून हे विवाह थांबविण्यात आले. ही कारवाई महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे व प्रकल्प समन्वयक विकास चव्हाण यांच्या आदेशानुसार करण्यात आली.