Uddhav Thackeray Dharashiv Rally  Pudhari
धाराशिव

Uddhav Thackeray : "गद्दाराला उमेदवारी दिली, जाहीर माफी मागतो"; धाराशिवमधील सभेत उद्धव ठाकरेंचा ओमराजेंसह भाजपवर हल्लाबोल

मला ओमराजे हवे होते, त्यांना खासदार हवा होता

पुढारी वृत्तसेवा

Uddhav Thackeray Dharashiv Rally : मला ओमराजे हवे होते, त्यांना खासदार हवा होता. मी माणसं जपणारा माणूस आहे. खासदार हे निवडणुकीत येतात आणि जातात, पण माणूस जपला पाहिजे. मी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना जपण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी गद्दारी केली. अशा एका गद्दाराला उमेदवारी दिली याबद्दल मी तुमची जाहीर माफी मागतो," अशा अत्यंत भावनिक आणि तितक्याच आक्रमक शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर थेट हल्लाबोल केला. धाराशिव येथील जाहीर सभेत ते बोलत होते. गद्दारीला आता अजिबात थारा द्यायचा नाही, असे आवाहन करत ओमराजे गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

भाव वाढवून ओमराजेंनी गद्दारी केली

"शिवसेनेचे पाच खासदार फुटले होते. दोन तृतीयांश खासदारांचा आकडा गाठण्यासाठी त्यांना आणखी एकाची गरज होती. याचाच फायदा घेत ओमराजे निंबाळकर यांनी स्वतःचा भाव वाढवून घेतला, असा आरोप करत जोपर्यंत माझ्यात जीव आहे, तोपर्यंत उद्धव ठाकरे तुमच्यासोबतच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

भाजपमध्ये अंतर्गत कलह; देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध षडयंत्र

भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी मोठा दावा केला. "कदाचित देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राहणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध पक्षातच षडयंत्र चालू आहे. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावरून गेले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. नितीन गडकरी हे दुसऱ्या टर्मला असताना मुद्दामून त्यांच्या भानगडी काढल्या गेल्या. फडणवीस यांना संपवण्यासाठीच ही सगळी गद्दारी घडवून आणण्यात आली आहे. म्हणूनच हे सहा खासदार भाजपमध्ये थेट गेले नाहीत, असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला.

भाजप नव्हे, ही तर 'बाबर जनता पार्टी'

"तुम्हाला मंदिर बांधायचे नव्हते, तर लुटायचे होते. आताची भाजप ही जुनी राहिलेली नाही, ती नवीन भाजप असून 'बाबर जनता पार्टी' झाली आहे. तुमच्यात आणि बाबरी मानसिकतेत आता काय फरक उरला आहे? आम्ही छत्रपती शिवरायांचे आणि शेतकऱ्याला हक्काचा दाम देणारे खरे हिंदुत्व मानतो," असा पुन्‍नरुच्‍चारही त्‍यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT