Two wildcat cubs found
दांडेगाव, पुढारी वृत्तसेवा कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव शिवारातील एका शेतात रान मांजराची दोन पिल्ले रविवारी दुपारी आढळून आली. सदर पिल्ले बिबट्याचीच असल्याची अफवा होती. मात्र ही पिल्ले रान मांजराची असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांनी केले.
कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव शिवारात प्रदीप बळवंते यांचे शेत आहे. त्यांच्या शेतातील काही क्षेत्रावर त्यांनी जनावरांसाठी चाऱ्याचे पिक घेतले आहे. रविवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास बळवंते हे जनावरांना चारा पाणी करण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी त्यांनी हिरवा चारा कापणी करतांना चारा पिकातून पिल्लांचा आवाज आला.
त्यामुळे त्यांनी चारा कापणी थांबवली. त्यांनी पिल्लांच्या आवाजाच्या दिशेने पाहणी केली असता दोन गोंडस पिल्ले दिसून आली. दरम्यान, या भागात बिबट्याचा वावर असल्याने सदर पिल्ले बिबट्याची असल्याची शक्यता घेऊन बळवंते यांनी तातडीने इतर शेतकऱ्यांना सतर्क केले. त्यानंतर वन विभागालाही या बाबत माहिती देण्यात आली.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पिल्लांचे व्हिडीओ पाठविण्यात आले. त्यानंतर सदर पिल्ले बिबट्याची नसून रान मांजराची असल्याचे स्पष्ट झाले. वन विभागाच्या या माहितीनंतर परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.