उमरगा शहरामध्ये सध्या साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. रूग्ण थंडी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी खोकला या विकाराने त्रस्त आहेत. मागील चार दिवसांमध्ये डेंग्यू सदृश तापाने दोन वेगवेगळ्या मुलांचा सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत नगरपालिका आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहर व परिसरात साथीच्या रोगाने चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण त्रस्त झाले आहेत. या दरम्यान शहरातील मदनानंद कॉलनी परिसरातील ओम शिवाजी साळूंके (वय.१९) याला पाच दिवसांपूर्वी डोकेदुखी अंगदुखी व थंडी तापाचा त्रास होऊ लागल्याने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर केलेल्या चाचणीत रक्ताचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर उपचारा दरम्यान गुरुवारी ओम याचा मृत्यू झाला.
पतंगे रोड परिसरातील सत्यजीत हणमंत देशमुख (वय. १२) यालाही डेंग्यू सदृश्य लक्षणे दिसताच त्याला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सत्यजित यालाही सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान शनिवारी, (दि ३१ )सत्यजीत याचा मृत्यू झाला. शहरात चार दिवसांत दोन मुलांचा डेंग्यू सदृश तापामुळे मृत्यु झाल्याने खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. नगरपालिकेकडून कोणत्याही प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे .
शहरात पालिका आरोग्य विभागाकडून मिथिनॉल पावडरची धुर फवारणी, गटारीवर प्रायाझुल पावडर, पाण्यात ॲबेटिंग टाकण्यात येत आहे. ठिक ठिकाणी गटारी च्या पाण्याचा निचरा करुन देण्यच्या सुचना दिल्या आहेत. सर्वत्र साफसफाई करण्यात येत आहे.-तुळशीदास वराडे, आरोग्य निरिक्षक,नगरपरिषद