Dharashiv Accident : उमरग्याजवळ दोन कारचा भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू  File Photo
धाराशिव

Dharashiv Accident : उमरग्याजवळ दोन कारचा भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू

सर्व मृत बिदरचे रहिवासी, वाहनांचा झाला चक्काचूर

पुढारी वृत्तसेवा

Two cars collide near Umargya, four die on the spot

उमरगा, पुढारी वृत्तसेवा : देवदर्शन करून गावाकडे कारने परत निघालेल्या चौघांवर काळाने घाला घातला. दाट धुक्यात भरधाव वेगातील कारच्या चालकाचे नियंत्रण सुटून दुसत्या बाजूने समोरून येणाऱ्या कारला जोराची धडक बसली. या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले. मंगळवारी (दि. २१) सकाळी सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील दाळिंब (ता. उमरगा, जि. धाराशिव) गावाजवळ हा अपघात झाला. अपघातातील मृत हे कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

दीपावली सणानिमित्त कर्नाटकातील भाविक सोमवारी (केए ३८ एम ९९४६) या कारने सोलापूर जिल्ह्यातील हुलजंती येथील महालिंगराया देवस्थानच्या दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून गावाकडे परतत असताना मंगळवारी सकाळी दाळिंब व शिवाजी नगर तांडा (ता. उमरगा) दरम्यान असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळील लहान वळणावर दाट धुक्यात सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या टाटा सफारी (एमएच १४ इ पी ०७३२) चालकाचा ताबा सुटला, भरधाव वेगातील कार महामार्गावरील दुभाजकाला जोरात धडकून हवेत उडाली, आणि दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूने समोरून येणाऱ्या भाविकांच्या ग्रैंड विटारा गाडीवर आदळली.

यात विटारा कार महामार्गालगच्या खड्यात फेकली गेली. ग्रैंड विटारामधील रतिकांत मारुती बसगौडा (३०), शिवकुमार चितानंद वग्गे (२६), संतोष बजरंग बसगौडा (२०), सदानंद मारुती बसगौडा (१९) चौघेही रा खाशमपूर (बिदर) हे भाविक जागीच ठार झाले. विटारा कारचालक दिगंबर जगन्नाथ संगोळगी (३१) व सफारी चालक लावण्य हणमंत मसूती (२२, रा. सोलापूर) हे दोघे गंभीर जखमी झाले. यातील चारही मृतदेह उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. तर जखमी दोन्ही चालकांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर व बिदर येथे पाठविण्यात आले.

जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यासाठी दाळिंबचे सरपंच प्रशांत देवकते, बाबा जाफरी, शिवाजी जाधव आदींसह ग्रामस्थांनी मदत केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी मुरूम पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप दहीफळे, पोलिस उपनिरीक्षक डी डी गव्हाने, संजीवन शिंदे, नागनाथ वाघमारे आदी उपस्थित होते.

चित्रपटातील दृश्याप्रमाणे..

तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावरील या वर्षात झालेल्या अपघाताच्या घटना पैकी दाळींब शिवारातील अपघाताची सर्वात मोठी घटना आहे. एखाद्या अँक्शनपट चित्रपटातील दृश्यायाप्रमाणे सफारी कार ग्रॅन्ड विटारा कारवर आदळली, यात विटारा कार अक्षरशः चेंदामेंदा होवून हवेत घिरट्या घालीत महामार्गाच्या बाजूच्या खड्यात फेकली गेली. तर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी अपघातग्रस्त कार मधील जखमींना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT