धाराशिव

Dharashiv Drought News : अर्ध्या गुंठ्यात सव्वादोन किलो सोयाबीन !

पीक कापणी प्रयोगातून दुष्काळाची तीव्रता स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

Two and a quarter kilograms of soybeans from half a guntha!

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : पावसातील दीर्घ खंडाचा सोयाबीन उत्पादनाला मोठा फटका बसला असून, तुळजापूर शिवारातील पीक कापणी प्रयोगात अर्ध्या गुंठ्यात अवघे दोन किलो 250 ग्रॅम सोयाबीन निघाले. विशेष म्हणजे या पिकाला दोन वेळा पाणी देण्यात आले होते. या प्रयोगातून खरीप हंगामातील उत्पादनातील घट आणि दुष्काळाची तीव्रता स्पष्ट झाली आहे.

तुळजापूर शिवारातील सर्वे क्रमांक 98 मध्ये शेतकरी विकास उत्तम भोजने यांच्या शेतात खरीप हंगामातील दुसरा पीक कापणी प्रयोग करण्यात आला. सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने पिके जोमात होती. मात्र, ऐन फुलोऱ्याच्या काळात पावसाने दडी मारल्याने सोयाबीनसह उडीद, मूग आणि तूर या पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला.

अर्ध्या गुंठ्यात मिळालेल्या उत्पादनानुसार एकरी सुमारे 180 किलो, तर हेक्टरी सुमारे साडेचार क्विंटल सोयाबीन उत्पादन अपेक्षित आहे. पीक कापणी प्रयोगावेळी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे, मंडळ अधिकारी अमर गांधले, तलाठी शरद दूधभाते, माजी नगराध्यक्ष पंडितराव जगदाळे यांच्यासह महसूल, कृषी आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नुकसान निश्चितीसाठी 50 टक्के पीक कापणी प्रयोग आणि 50 टक्के उपग्रहाद्वारे पाहणीच्या आधारे आकडेवारी विचारात घेतली जाणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. उत्पादन घटल्याने शेतीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शासनाच्या मदतीकडे आणि पीकविमा भरपाईकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT