Tuljapur unseasonal rain file photo
धाराशिव

Tuljapur unseasonal rain: तुळजापूर तालुक्‍याला अवकाळीने झोडपले, गारपीठ झाल्याने रस्त्यावर बर्फ

तुळजापूर शहर व तालुक्यात सोमवारी सायंकाळी सुमारे दीड तास झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Tuljapur unseasonal rain

तुळजापूर : शहर व तालुक्यात सोमवारी सायंकाळी सुमारे दीड तास झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या अवकाळी पावसाचा गहू, ज्वारीसह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील अनेक भागात गारपीठ झाली.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले. देवसिंगा तुळ येथे लक्ष्मण शिंदे यांच्या दोन एकर ढबू मिरचीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. उशिरा पेरणी करून तयार झालेले पीक या पावसामुळे वाया गेले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. काक्रंबा, सलगरा, पिंपळा, सुरतगाव, खुदावाडी, सावरगाव, काटी, जळकोट, नंदगाव, होर्टी, अणदूर या भागांतही मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.

शहरातही वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांची पडझड, पत्रे उडण्याच्या घटना घडल्या. तसेच बाहेरून येणाऱ्या भाविकांना पावसाचा त्रास सहन करावा लागला. पुजारी नगर येथील गणेश पुजारी यांनी लग्न समारंभासाठी उभारलेली व्यवस्था व सजावटीवर केलेला लाखोंचा खर्च पावसामुळे वाया गेला.

दरम्यान, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव अभिजीत चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगत शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून मदत जाहीर करावी, अन्यथा शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

SCROLL FOR NEXT