तुळजापूर : तालुक्यात बहुतांश भागात रस्त्यांची अशी चाळण झाली आहे.  pudhari photo
धाराशिव

Tuljapur rural roads issue : तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था

नागरिकांना भोगाव्या लागताहेत मरणयातना

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत विदारक बनली असून ठिकठिकाणी प्रचंड खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि धोकादायक पूल यामुळे नागरिकांना अक्षरशः मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बसेस बंद करण्याची वेळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर (एसटी) आल्याची माहिती आहे.

तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये रस्त्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही रस्ते दुरुस्तीचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला होता.

तुळजापूर तीर्थक्षेत्राला अक्कलकोट तीर्थक्षेत्राशी जोडणारा रस्ता अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. तुळजापूर ते मंगरूळ मार्गावर प्रचंड खड्डे पडले असून सुमारे 150 अपघात झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. तसेच नळदुर्ग ते अक्कलकोट मार्ग न्यायालयीन तक्रारी व अन्य कारणांमुळे रखडला आहे.

आरळी खुर्द ते काळेगाव हा रस्ता मागील वीस वर्षांपासून प्रलंबित असून संपूर्ण मार्ग खड्ड्यांनी व्यापलेला आहे. या मार्गावरील पूल धोकादायक बनले असून सुमारे 200 अपघात झाल्याचे सांगितले जाते. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. बांधकाम खात्याच्या नकाशावर हा रस्ता उशिरा समाविष्ट झाला असला तरी अद्याप निधीची तरतूद झालेली नाही.

इटकळहनूर, अंदुरखुदावाडी, सावरगाव वडाळा यासह सुमारे 60 हून अधिक रस्त्यांची दुरुस्ती प्रलंबित आहे. ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेकडे ठराव सादर करून पाच वर्षे उलटून गेली, तरीही मंजुरी व प्रत्यक्ष काम सुरू नसल्याची तक्रार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठविला जात नसल्याचा आरोपही स्थानिकांकडून होत आहे. तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून संबंधित विभागाने तातडीने निधीची तरतूद करून कामे सुरू करावीत, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

आरळी खुर्द हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. आमचा रस्ता वीस वर्षांपासून नादुरुस्त आहे. अनेक अपघात झाले, तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तातडीने निधी उपलब्ध करून रस्ता दुरुस्त करावा, ही लोकभावना आहे.
महेश गवळी, जिल्हाध्यक्ष, स्वराज्य पक्ष.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT