तुळजापूर: पुढारी वृत्तसेवा : तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर आशिष गणेश सोनटक्के व उपसभापतीपदावर सुहास शामराव गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
सहाय्यक निबंधक बी. पी. मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सभापती पदासाठी तीन अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील दोघांनी आपले अर्ज मागे घेतले त्यामुळे आशिष गणेश सोनटक्के यांची बिनविरोध सभापती म्हणून निवड घोषित करण्यात आली. त्यानंतर उपसभापती पदासाठी देखील बिनविरोध सुहास शामराव गायकवाड यांना निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांनी घोषित केले.
सभापती पदावर निवड झालेले आशिष सोनटक्के हे माजी जि.प. सदस्य गणेश सोनटक्के यांचे चिरंजीव आहेत. यापूर्वी मावळते सभापती म्हणून सचिन पाटील यांनी काम केलेले आहे. निवड प्रक्रियेच्या या बैठकी दरम्यान आमदार राणा जगजित पाटील, युवक नेते विनोद गंगणे, माजी सभापती विजय गंगणे, मजूर फेडरेशनचे चेअरमन नारायण ननवरे, सतीश दंड नाईक, दीपक आलुरे, आनंद कंदले, संतोष बोबडे, सिद्धेश्वर कोरे , विजय शिंगाडे, बालाजी रोचकरी संतोष कदम , अॅड. रामचंद्र ढवळे, सोनल कदम, संजय भोसले, अशोक पाटील, सुनील जाधव यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चांगले काम सुरू आहे. मला सभापती पदावर बसण्याची जी संधी मिळालेली आहे. त्याचा उपयोग आपण शेतकरी आणि व्यापारी यांच्या हितासाठी करणार आहे.आशिष गणेश सोनटक्के, नवनिर्वाचित सभापती