सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सरकारच्या दडपशाही, भ्रष्टाचारी आणि शेतकरीविरोधी भूमिकेमुळे मंगळवारी (दि. 1) काढलेल्या संग्राम मोर्चात शेतकरी बैलगाड्या घेऊन सहभागी झाले होते.
चार हुतात्म्यांना अभिवादन करून मोर्चास सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिद्धेश्वर मंदिरासमोरून पासपोर्ट ऑफिसमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आला. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. यावेळी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकार्यांनी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आ. दिलीप माने, शहराध्यख चेतन नरोटे, कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आडम मास्तर, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, बाबा मिस्त्री, महादेव कोगनुरे, राजशेखर शिवदारे, अशोक निंबर्गी, आरिफ शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, भारत जाधव, नलिनी चंदेले, सर्फराज शेख, अक्षय वाकसे, शिवसेनेचे प्राध्यापक अजय दासरी, महिला आघाडीच्या सीमा पाटील उपस्थित होते.
महाविकास आघाडीने काढलेल्या संग्राम मोर्चात खासदार शिंदे या खांद्यावर प्रतिकात्मक नांगर घेऊन सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे मोर्चात सर्वांचे लक्ष त्या वेधून घेत होत्या.