Navratri Utsav 2026 pudhari
धाराशिव

Navratri Utsav 2026: शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भवानी ज्योत घेऊन हजारो भक्तांची पायपीट!

सोलापूर–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ‘आई राजा उदो उदो’चा जयघोष

Anirudha Sankpal

रत्नापूर पुढारी वृत्तसेवा: बाळासाहेब जाधवर

हातात पेटती भवानी ज्योत, मुखात ‘आई राजा उदो उदो’चा जयघोष आणि मनात तुळजाभवानी मातेप्रती अढळ श्रद्धा... असे भक्तिमय चित्र सध्या सोलापूर–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पाहायला मिळत आहे. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूर येथून भवानी ज्योत घेऊन हजारो भाविक आपल्या गावाकडे पायी मार्गक्रमण करीत आहेत. देवीच्या जयघोषाने महामार्गावर भक्तीचा जागर सुरू असून, भाविकांच्या श्रद्धेचे दर्शन घडत आहे.

गावोगावी ज्योत नेण्याची परंपरा

तुळजाभवानी मातेच्या ज्योतीला भाविकांच्या जीवनात विशेष महत्त्व आहे. अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूर येथून भवानी ज्योत आपल्या गावात नेण्याची परंपरा श्रद्धेने जपली जात आहे. मंदिरातून प्रज्वलित केलेली ज्योत भाविक पायी आपल्या गावापर्यंत घेऊन जातात. गावात पोहोचल्यानंतर या ज्योतीच्या माध्यमातून देवीची स्थापना करून नऊ दिवस पूजा-अर्चा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

दोन किलोमीटर चालल्यानंतर दुसऱ्या भक्ताकडे ज्योत

या पायी प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे भाविकांमधील सामूहिक सहभाग आणि परस्पर सहकार्य. प्रत्येक भाविक साधारण दोन किलोमीटरपर्यंत ज्योत घेऊन चालतो. त्यानंतर दुसरा भाविक ज्योत हातात घेऊन पुढील प्रवास सुरू करतो. अशा पद्धतीने एकमेकांना साथ देत भाविक आपल्या गावाकडे वाटचाल करतात. हातात पेटती ज्योत आणि मुखातून घुमणारा ‘आई राजा उदो उदो’चा गजर यामुळे महामार्गावरील वातावरण भक्तिमय झाले आहे.

अविनाश खोसे यांची दहा वर्षांपासून अखंड परंपरा

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गणसांगवी येथील अविनाश खोसे हे गेल्या दहा वर्षांपासून तुळजापूरहून भवानी ज्योत पायी घेऊन आपल्या गावाकडे जात आहेत. दैनिक ‘पुढारी’शी बोलताना त्यांनी या परंपरेविषयी माहिती दिली. दरवर्षी अनेक भाविक तुळजापूरहून ज्योत घेऊन गावात पोहोचतात. त्यानंतर या ज्योतीच्या माध्यमातून देवीची स्थापना करून नऊ दिवस श्रद्धेने पूजा-अर्चा केली जाते, असे त्यांनी सांगितले.

महामार्गावर भक्ती आणि श्रद्धेचा जागर

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूरहून आपल्या गावाकडे निघालेल्या भाविकांच्या जत्थ्यांमुळे सोलापूर–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाची आणि पायपीटीची तमा न बाळगता भाविक श्रद्धेने प्रवास करीत आहेत. तुळजाभवानी मातेप्रती असलेली निष्ठा, पिढ्यान्‌पिढ्या जपली जाणारी धार्मिक परंपरा आणि सामूहिक भक्तिभाव यांचे दर्शन या भवानी ज्योत यात्रेतून घडत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT