तुळजाभवानी मंदिर 
धाराशिव

तुळजाभवानी मंदिरात दुसऱ्या माळेस नेत्रदीपक फुलांची सजावट

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : तुळजाभवानी देवीचा गाभारा, सिंह गाभारा, आणि मंदिराचा सर्व परिसर दुसऱ्या माळेच्या दिवशी फुलांनी सजविण्यात आला होता. दरम्यान दुसऱ्या दिवशी सुमारे ७० हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. बुधवारी रात्री निघालेल्या छबिना मिरवणुकीमध्ये आई राजा उदो उदो जयघोषामध्ये भाविकांनी छबिण्याचे दर्शन घेतले.

धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर मंदिर संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तालुकाप्रमुख संभाजी पलंगे व शहर प्रमुख बापूसाहेब भोसले यांची याप्रसंगी उपस्थिती होती. पालकमंत्री सावंत यांनी तुळजाभवानी यात्रा नियोजनाचा याप्रसंगी आढावा घेतला आणि योग्य ते निर्देश अधिकाऱ्यांना दिले सर्व खात्याचे अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते.

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या दुसऱ्या माळीस तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून पहाटेपासून धार्मिक विधीला सुरुवात झाली. पहाटे देवीचे चरणतीर्थ संपन्न झाल्यानंतर देवीला अभिषेक पुजेसाठी बोलाविण्यात आले. त्यानंतर सकाळी दहा वाजेपर्यंत दही, दूध यांचे अभिषेक संपन्न झाले. नित्योपचार पुजा झाल्यानंतर आरती आणि नैवेद्य दाखविण्यात आला. दरम्यान भाविकांचे दर्शन मध्यरात्री एक वाजेपासून सुरू होते. दर्शन मंडप भाविकांच्या गर्दीने फुलून निघालेला होता. घाटशीळ प्रवेश मार्गावरून सर्व भाविकांना धर्मदर्शन मुखदर्शन आणि अभिषेक पुजेसाठी सोडण्यात येत होते. मात्र शेकडो भाविक बस स्थानक आणि परंपरागत मार्गावरून राजे शिवाजी महाद्वार येथे आल्याचे दिसून आले.

बुधवारी रात्री दहा वाजता निघालेला छबिना अत्यंत मंगलमय आणि भक्ती भावाने निघाला. तुळजाभवानी देवीचे भाविक भक्त आराधी गोंधळी पोतराज यांच्यासह तुळजाभवानी देवीचे गोंधळी या छबिण्यासमोर आपले स्तवन आणि देवीची गीते गायन करीत होते. संबळाचा निनाद आणि आई राजा उदो उदो जयघोष यामुळे सर्व परिसर भक्तीमय बनला. शेकडो भाविकांनी चलनी नाणी, फुले आणि कुंकू यांची उधळण करून छबिनामध्ये पोत ओवाळाला दर्शन घेतले. येथील स्थानिक पुजारी आणि शहरवासीयांनी बाहेर छबिना सुरू असताना तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यामध्ये प्रकळ पूजा केली. गोमुख तीर्थाचे पाणी मंगल कलशांमध्ये आणल्यानंतर ते देवीचे महंत यांना देऊन देवीचा गाभारा आणि परिसर परंपरागत पद्धतीने स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर खडीसाखर आणि फुटाण्याचा देवीला नैवेद्य याप्रसंगी दाखविण्यात आला. आई राजा उदो उदोच्या जयघोषामध्ये ही प्रक्षाळ पूजा संपन्न झाली.

पुणे येथील उद्योजक एस एस तामाने यांनी तुळजाभवानीची सेवा करण्याच्या उद्देशाने देवीचा गाभारा आणि मंदिर परिसर विविध रंगी नेत्र दीपक फुलांनी सजविला होता. मंदिरात केलेली सजावट पाहण्यासाठी देखील भाविकांनी खूप मोठी गर्दी केली. पिवळ्या रंगाचा जास्त वापर केल्यामुळे संपूर्ण मंदिर परिसराला सुवर्ण किनार मिळाली होती. मंदिर संस्थांनी केलेली विद्युत रोषणाई आणि पुणे येथील तामानी यांनी केलेली फुलांची सजावट भाविकांच्या मनाला भावली. फुलांच्या माध्यमातून राजे शहाजी महाद्वारासमोर बनविण्यात आलेले फुलांची देवीचे मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. वेगवेगळे २२ फुलांचे कलाकार सुमारे १८ तासापासून ही सजावट करण्याचे काम करत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT