तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात दुसऱ्या माळेला हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सोमवारी रात्री देवीची नंदी वाहनातून पारंपरिक छबिना मिरवणूक काढण्यात आली. हा नयनरम्य सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी भाविकांची अथांग उपस्थिती लाभली होती.
महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई; तसेच विविधरंगी फुलांची आकर्षक सजावट यामुळे संपूर्ण परिसराला दिव्य आणि देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे.
ज्येष्ठ भाविकांना त्रासाचा सामना
दरम्यान, प्रशासनाकडून बिडकर तलावाच्या पायऱ्यांजवळून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. मात्र, या नियोजनामुळे ज्येष्ठ भाविकांना चालताना व रांगेत उभे राहताना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले. या ठिकाणी प्रशासनाने योग्य व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
या सोहळ्याप्रसंगी तहसीलदार अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक माया माने, सहायक व्यवस्थापक अनुप ढमाले, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांच्यासह मंदिर संस्थानचे कर्मचारी, पुजारी, सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशी झाली सजावट
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर गाभारा, मुख्य प्रवेशद्वार आणि संपूर्ण परिसर फुलांच्या माळा व रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. हा रोषणाईचा सोहळा भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.