डॉ. सतीश महामुनी
तुळजापूर : आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो... च्या जयघोषमध्ये सोमवारी दुपारी बारा वाजता तुळजाभवानी मंदिरात घटाची मिरवणूक संपन्न झाली. बारा वाजता यजमान मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती पुजारी व त्यांच्या पत्नी सौमय्याश्री यांच्या हस्ते घटस्थापना विधी संपन्न झाला. या घटस्थापनेच्या बरोबर शारदीय नवरात्र महोत्सवाच्या देवीच्या नऊ दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली.
मध्यरात्री एक वाजता तुळजाभवानी देवीची 14 सप्टेंबर रोजी सुरू झालेली मंचकी निद्रा पूर्ण झाली आणि विधिवता आणि परंपरागत पद्धतीने तुळजाभवानी देवीची मुख्य मूर्ती चांदीच्या सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आली. त्यानंतर देवीला अभिषेक घालण्यात आले मानाचे नैवेद्य व आरती करण्यात आली. मोठ्या संख्येने आरतीसाठी उपस्थित होते. या निमित्ताने मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नवरात्र काळात येणाऱ्या भाविकांना आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
घटस्थापनाप्रसंगी आमदार तथा विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पत्नी सौमय्याश्री पुजार, जि. प.च्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, तहसीलदार माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजीबुवा, महंत बजाजीबुवा, महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजी बुवा, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो यांच्यासह पुजारी बांधव व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी बारा वाजता प्रथेप्रमाणे धाकटे तुळजापुरातील कुंभार कुटुंबीयांकडून मंदिराला मातीचे तीन कलश देण्यात आले. या कलशामध्ये गोमुख व कल्लोळ तीर्थाचे पवित्र जल भरण्यात आले . या कलशाची मिरवणूक मंदिर परिसरात वाजत गाजत करण्यात आली. आई राजा उदो उदो जय गोशांमध्ये सर्वांनी घटाच्या मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत गोमुख तीर्थाजवळ गंगा आवाहन करण्यात आले. तुळजाभवानी मंदिरातील सिंह गाभारा, आदिमाया आदिशक्ती मंदिर व त्रिशूल मंदिर येथे विद्युत पद्धतीने यजमानाच्या हस्ते घटस्थापनेचा विधी संपन्न झाला.
तसेच तुळजापुरातील प्रफुल्ल कुमार शेटे , मयूर शेटे व प्रशांत शेटे कुटुंबीयांकडून सप्तधान्य (जवस, करडई, मूग, ज्वारी, गहू, मका व सातू) दिले जाते. घटाची स्थापना जिल्हाधिकारी श्री व सौ कीर्ती पुजार यांच्या हस्ते केली. देवींची पहिली माळ जी नागवेलीची माळ घटावर अर्पण केली. घटस्थापनेनंतर मंदिर संस्थानच्या वतीने ब्राह्मणास सप्तशतीचे पाठ, होम हवन यासाठी स्थानिक ब्रह्म वृंदांना अनुष्ठानासाठी वर्णी विधिवत परंपरागत पद्धतीने देण्यात आली.
या कार्यक्रमांमध्ये येथील माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी नगरसेवक अविनाश गंगणे, भाजपा तालुकाध्यक्ष आनंद कंदले, प्रा. धनंजय लोंढे, भोपे पुजारी अतुल मलवा, प्रा संभाजी भोसले, कुमार इंगळे प्रशांत सोनजी, मानकरी प्रफुल्ल कुमार शेटे, मकरंद प्रयाग, श्रीराम अपसिंगेकर यांच्यासह इतर पुजारी उपस्थित होते.