बाळासाहेब जाधवर
रत्नापूर : हातात पेटती भवानी ज्योत, मुखात आई तुळजाभवानीचा जयघोष आणि मनात अढळ श्रद्धा... असे भक्तिमय चित्र सध्या सोलापूर–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पाहायला मिळत आहे. दसऱ्याच्या निमित्ताने तुळजापूर येथून भवानी मातेची ज्योत घेऊन हजारो भाविक आपल्या गावाकडे पायी मार्गक्रमण करत आहेत. उन्हाची तमा न बाळगता, पायपीट करत आणि देवीचा गजर करत निघालेल्या या भक्तांमुळे महामार्गावर भक्तीचा जागर सुरू आहे.
तुळजाभवानी मातेच्या ज्योतीला भाविकांच्या जीवनात विशेष महत्त्व आहे. अनेक वर्षांपासून दसऱ्यानिमित्त तुळजापूर येथून ज्योत घेऊन जाण्याची परंपरा भक्तांकडून श्रद्धेने जपली जात आहे. मंदिरातून ज्योत प्रज्वलित करून ती आपल्या गावापर्यंत नेली जाते. त्यानंतर या ज्योतीच्या साहाय्याने गावात तुळजाभवानी मातेची स्थापना केली जाते.
नऊ दिवस देवीची पूजा-अर्चा करून भक्तिभावाने उत्सव साजरा केला जातो. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गणसांगवी येथील अविनाश खोसे हे गेल्या दहा वर्षांपासून तुळजापूरहून भवानी ज्योत पायी घेऊन आपल्या गावाकडे जात आहेत. दैनिक ‘पुढारी’शी बोलताना त्यांनी या परंपरेविषयी माहिती दिली.
अनेक भाविक दरवर्षी तुळजापूरहून ज्योत घेऊन आपल्या गावात जातात. गावात पोहोचल्यानंतर या ज्योतीच्या साहाय्याने देवीची स्थापना करून नऊ दिवस पूजा-अर्चा केली जाते, असे त्यांनी सांगितले. दसऱ्याच्या निमित्ताने तुळजापूरहून गावोगावी पोहोचणाऱ्या या भवानी ज्योतींमुळे भाविकांच्या मनात उत्साह संचारला असून, महामार्गावर सर्वत्र ‘आई तुळजाभवानीचा जयजयकार’ घुमत आहे.
महामार्गावर भक्तीचा जागर
सोलापूर–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून हजारो भाविक ज्योत घेऊन जात असल्याचे दृश्य लक्ष वेधून घेत आहे. हातात पेटती ज्योत आणि ओठांवर देवीचे नाव, अशा भक्तिमय वातावरणात भाविक आपला प्रवास पूर्ण करत आहेत. तुळजाभवानी मातेप्रती असलेली श्रद्धा, परंपरेबद्दलची निष्ठा आणि सामूहिक भक्तिभाव यांचे दर्शन या पायी प्रवासातून घडत आहे.
दोन किलोमीटर ज्योत, पुन्हा दुसऱ्याकडे जबाबदारी!
या प्रवासातील वैशिष्ट्य म्हणजे ज्योत घेऊन जाण्यासाठी भाविक एकमेकांना साथ देतात. प्रत्येक भक्त साधारण दोन किलोमीटर ज्योत घेऊन चालतो. त्यानंतर दुसरा भक्त ज्योत हातात घेतो आणि पुढचा प्रवास सुरू होतो. अशा प्रकारे सामूहिक सहभागातून हजारो भाविक आपल्या गावाकडे वाटचाल करतात. प्रत्येकाच्या मुखातून उमटणारा ‘आई राजा उदो उदो’चा जयघोष वातावरणात चैतन्य निर्माण करतो.