तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला रविवारी दुपारी बारा वाजता घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. नऊ दिवस चालणार्या या नवरात्र महोत्सवात भाविकांची मोठी गर्दी होणार हे गृहीत धरून मंदिर संस्थान आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. (Tuljabhavani Devi )
जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे हे घटस्थापना या धार्मिक विधीसाठी यजमान असणार आहेत. सकाळी सात वाजता देवीच्या दही आणि दुधाच्या अभिषेकाला सुरुवात होईल. देवीची नित्य उपचार पूजा होईल आणि त्यानंतर घटस्थापना विधिवत पद्धतीने केली जाईल.
मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असल्यामुळे घाटशीळ वाहनतळ येथे मंडप उभारून तेथे वीस हजार भाविकांना थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दीपक संघ येथून घाटशीळमार्गे या दर्शन मंडपामध्ये भाविकांना जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून हे भाविक एक तासाच्या अंतराने मुख्य दर्शन मंडपामध्ये येतील. येथून भाविकांना दोन तासांचा अवधी दर्शनासाठी लागण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
सप्तशृंगी : आद्य शक्तिपीठ व उत्तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी देवीच्या नवरात्र उत्सवास रविवारी (दि. 15) प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर गडावर भाविकांची मांदियाळी आहे. रविवारी सकाळी देवीच्या विविध अलंकारांची वाजतगाजत मिरवणूक काढून देवीला पंचामृताची आंघोळ घालून महाआरती करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता घटस्थापना होणार आहे. गाभार्यात 111 घटांची स्थापना करण्यात येणार आहे. माळेच्या पहिल्या दिवशी साधारण तीस हजार भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. (Tuljabhavani Devi )
श्रीक्षेत्र माहूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ पीठ असलेल्या श्री रेणुकामाता मंदिरात 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होत आहे. भाविकांना दर्शन सुलभ आणि आल्हाददायक वातावरणात घडावे म्हणून सर्वच विभागांनी सूक्ष्म नियोजन केले आहे. तसेच गर्दीनुसार मंदिर उघडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Tuljabhavani Devi )