६२७ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात झाले बंद file photo
धाराशिव

६२७ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात झाले बंद

धाराशिव : मतदारांचा दुपारनंतर वाढला उत्साह

पुढारी वृत्तसेवा

The fate of 627 candidates has been sealed in the voting machines

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद व पंचायत समिती या 'मिनी मंत्रालय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शनिवारी (दि. ७) जिल्हाभरात शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यातील सुमारे ११ लाख ४५ हजार मतदारांपैकी साडेसहा लाखांहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या मतदानातून ६२७ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. मतदानाची अंतिम आकडेवारी रात्री उशिरापर्यंत (नऊपर्यंत) प्राप्त झाली नाही.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ५५ गट व ११० गणांमध्ये ही निवडणूक घेण्यात आली. यासाठी जिल्हाभरात १३०८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. ग्रामीण तसेच दुर्गम भागातील मतदारांनाही मतदान करता यावे, यासाठी प्रशासनाने आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.

ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळसरळ नसून, बहुतांश तालुक्यांत स्थानिक पातळीवर सोयीने आघाड्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज्यात मित्रपक्ष असलेले अनेक पक्ष या निवडणुकीत परस्परविरोधात उभे ठाकल्याचे चित्र दिसून आले.

या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेसाठी २३४, तर पंचायत समितीसाठी ३९३ उमेदवार रिंगणात होते. मतदानासाठी आवश्यक ईव्हीएम, निवडणूक साहित्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आदी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होती. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून, अंतिम निकालाची उत्सुकता उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये शिगेला पोहोचली आहे.

दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५०.०७ टक्के मतदान झाले आहे. भूम तालुक्यात ५४.१८ टक्के मतदान होत आघाडीवर असून एकूण ५५ हजार ३३१ मतदारांनी मतदान केले. तुळजापूर तालुक्यात ५२.८३ टक्के मतदान झाले असून ९९ हजार ८६३ मतदारांनी हक्क बजावला. वाशी तालुक्यात ५१.५३ टक्के, तर कळंब तालुक्यात ५०.७७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. लोहारा तालुक्यात दुपारी साडेतीनपर्यंत ५१.२४ टक्के मतदान झाले असून ४१ हजार ७५३ मतदारांनी मतदान केले.

परंडा तालुक्यात ४८.९७ टक्के मतदान झाले असून ८४ हजार ५६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. धाराशिव तालुक्यात तुलनेने कमी म्हणजे ४७.४१ टक्के मतदान झाले असून १ लाख १८ हजार ४६३ मतदारांनी मतदान केले. उमरगा तालुक्यात दुपारी साडेतीनपर्यंत ४६.७१ टक्के मतदान झाले आहे. एकूण जिल्ह्यातील ११ लाख ४५ हजार ८८८ मतदारांपैकी ५ लाख ७३ हजार ७२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने सायंकाळच्या सत्रात मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT